
सुधीर नागापुरे । माजलगाव
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील चार गावात गुरुवारी एकादशी दिवशी दुपारी भगर खाल्ल्याने जवळपास 80 जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांवर माजलगाव आणि बीडच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गुरुवारी एकादशी असल्याने त्याचा उपवास घरोघरी करण्यात येतो. तालुक्यातील उमरी, छत्र बोरगाव, कोथरुळ, रोशनपुरी आदी गावात आठ दिवसांपूर्वी एका फिरस्ती भगर विक्रेत्याकडून गावातील दुकानदारांनी भगर खरेदी केली होती. गुरुवारी एकादशी दिवशी उपवास करणाऱ्यांनी भगर खाल्ल्याने त्यांना उलट्या-मळमळ असा त्रास होऊ लागला. एकट्या उमरी गावात जवळपास पन्नास महिला व पुरुषांना तर रोशनपुरी, छत्र बोरगाव, कोथरुळ या गावातील तीस जणांना असाच त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात तसेच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पाहता काहींना जिल्हा रुग्णालयात बीड येथे पाठवण्यात आले आहे.



























































