दहिसरमध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 13 जणांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर कांदरपाडा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाल्ल्यानंतर लहान मुलांसह तब्बल 23 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. केक खाल्ल्यानंतर काही वेळातच मळमळणे-उलटीचा त्रास सुरू झाल्याने या सर्वांना तातडीने पालिकेच्या जवळच्याच भगवती रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

दहिसर पश्चिम कांदरपाडा येथे एका सोसायटीतील अर्जुन सिंग यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सर्व मुलांना वाटण्यात आला. शिवाय यावेळी बिर्याणीदेखील वाटण्यात आली. मात्र काही वेळातच मुलांसह मोठय़ा व्यक्तींनाही मळमळ-उलटीचा त्रास सुरू झाला. अचानक हा त्रास होणाऱयांची संख्या वाढू लागल्याने एकच घबराट पसरली. त्यामुळे या सर्वांना पालिकेच्या भगवती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत विषबाधा झालेल्या 23 जणांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे. यातील काही मुलांवर जवळच्याच खासगी बाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर कार्यक्रमासाठी केक क बिर्याणी खरेदी करण्यात आलेल्या ठिकाणच्या पदार्थांचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले. शिवाय संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

केकशॉपला फूड, फायर, हेल्थची परवानगीच नाही – शिवसेना
दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार विलास पोतनीस, पालिका विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी भगवती रुग्णालयात जाऊन दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान, संबंधित कार्यक्रमात केक आणलेल्या शॉपधारकाने फक्त ‘एफडीए’ची परवानगी घेतलेली असून पालिकेकडून फूड, फायर आणि हेल्थची परवानगी घेतलीच नसल्याचे शीतल म्हात्रे यांनी महासभेत हरकतीचा मुद्दा मांडून निदर्शनास आणून दिले. संबंधित केक शॉपला पालिकेने एक महिन्यापूर्वीच नोटीस पाठवल्याचेही त्या म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, म्हात्रे यांनी उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दा राखून ठेवत संबंधितप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करा असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले.