हिंदुस्थान-बहरीन आमने सामने; सुनील छेत्री करणार बायचुंग भुतियाची बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शारजा

हिंदुस्थानचा संघ एएफसी आशियाई फुटबॉल स्पर्धेत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. उद्याच्या लढतीत बहरीनला हरवल्यास ब्ल्यू टायगर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंदुस्थानला अंतिम 16 मध्ये प्रवेश करता येणार आहे. स्टार खेळाडू सुनील छेत्रीच्या नावावरही उद्या एका विक्रमाची नोंद होणार आहे. हिंदुस्थानकडून सर्वाधिक 107 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या बायचुंग भुतियाची बरोबरी त्याला करता येणार आहे.

इतिहास प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूने

हिंदुस्थान-बहरीन यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सात लढतींच्या निकालावर नजर टाकल्यास प्रतिस्पर्ध्यांचे वर्चस्व दिसून येते. बहरीनने पाच सामने जिंकले असून फक्त एकाच सामन्यात हिंदुस्थानला विजय संपादन करता आलाय. दोन देशांमधील एक सामना ड्रॉ झालाय. हिंदुस्थानने एकमेव विजय मिळवलाय तो 1979 साली. शबीर अलीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर हिंदुस्थानने विजय मिळवला होता.

विजयासाठीच भिडणार – स्टीफन कॉन्स्टेण्टाइन

आम्ही बहरीनला हरवण्यासाठीच मैदानात उतरणार आहोत. त्यामुळे इतर लढतीच्या निकालावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाहीए.  या गटातून पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हेच आमचे लक्ष्य असणार आहे, असा विश्वास हिंदुस्थानचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेण्टाइन यांनी लढतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.

पराभूत झाल्यास…

हिंदुस्थानच्या संघाला बहरीनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यास काय होईल, असा यक्षप्रश्न हिंदुस्थानातील तमाम फुटबॉलप्रेमींना पडलाय. बहरीनने हिंदुस्थानला हरवले आणि यूएईने थायलंडला पराभूत केले तर अशा परिस्थितीतही हिंदुस्थानला आगेकूच करता येणार आहे. सहा गटांतील सर्वोत्तम दोन संघ अंतिम 16 मध्ये पोहोचणार आहेत. पण याच प्रत्येक गटातील तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या चार सर्वोत्तम संघांना पुढे वाटचाल करता येणार आहे. मात्र हिंदुस्थानने यावेळी किमान ड्रॉकडे तरी लक्ष द्यावे. अन्यथा पुढची वाटचाल जरतरवर अवलंबून असेल.