
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमध्ये दारुबंदी असतानाही नागरीक सर्रासपणे दारुची विक्री व खरेदी करत आहेत. दारुबंदीची योजना शंभर टक्के यशस्वी व्हावी यासाठी नितिश कुमार यांच्या सरकारने कडक पावलं उचलली आहेत. दारूचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने आता कुत्र्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तेलंगणाहून २० प्रशिक्षित श्वान मागवण्यात आले आहेत. हे श्वास वासावरुन माग काढत दारुचा साठा पकडून देतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
तेलंगणातील गुप्त प्रशिक्षण केंद्र (आयआय़टीए) येथून या श्वानांना बिहारमध्ये आणण्यात येणार आहे. या श्वानांच्या मदतीने पोलिसांना दारुच्या अड्ड्यांपर्यंत पोहचणे सोपे होणार आहे. बॉम्बशोधक पथकातील श्वान स्फोटक पदार्थांचा सुगावा घेत त्याच्या साठ्यापर्यंत पोहचतात, त्याचप्रमाणे हे श्वान देखील काम करणार आहेत. निमलष्करी दलाशीही यासंदर्भात संपर्कात असल्याचं बिहार गुन्हे विभागाचे प्रमुख पोलीस महिनिरिक्षक विनय कुमार यांनी सांगितलं आहे.

























































