आरक्षणासाठी धनगर तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सेलू

धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथेल एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना घडली. योगेश राधाकिशन कारके (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सोमवार, १३ ऑगस्टपासून समाजबांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यापार्श्वभूमीवर गोमेवाकडी येथील कार्यकर्ते रविवारी सेलू येथे आरक्षणाच्या बैठक घेण्याची तयारी करीत होते. हे कार्यकर्ते बैठकीसाठी निघाले असतानाच त्यांना वाटेतच योगेशने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समजली.

याप्रकरणी संपुर्ण गाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कोवळ्या वयातील योगेश खुपच हळवा होता. यानंतर संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी योगेशचा मृतदेह सेलू पोलीस ठाण्यासमोर आणला. यावेळी संतप्त जमावाने धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी जोरदार घोषणाही दिल्या. तसेच मृतदेह सेलू पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात ठेवून अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली. यावेळी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी मध्यस्थी करत मृत योगेशच्या कुटुंबीयास १० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्याचे लेखीपत्र दिले. लेखीपत्र घेतल्यानंतरच जमाव शांत झाला आणि मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. सायंकाळी उशीरापर्यंत अंत्यविधी झालेला नव्हता.

योगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून बी. शिंदे यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज लिहिला होता. त्यात धनगर आरक्षणासाठी, मी जीव देत आहे, असे म्हटले आहे. मात्र रेंजच्या कारणावरून हा मेसेज शिंदे यांना मिळाला नसावा, अशी माहिती बीट जमादार चवरे यांनी दिली.

summary…fore reservation dhangar boy commit suicide