वैद्यकीय उपचारासाठी परदेशी निधी स्वीकारता येणार, केंद्राकडून परवानगी

महाराष्ट्रात आता वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना परदेशी निधीही स्वीकारता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला नुकतेच केंद्र सरकारकडून परदेशी देणगी नियमन कायद्या अंतर्गत (एफसीआरए) प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र म्हणजे परदेशी निधी स्वीकारण्यासाठी मिळालेली परवानगी आहे.

‘एफसीआरए’ प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या मान्यतेमुळे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबरोबरच आता परदेशातून आलेल्या निधीचा उपयोगही गरजू रुग्णांसाठी करता येणार आहे. त्यातून बोन मॅरो ट्रान्सप्लांट, यकृत प्रत्यारोपण, न्युरो सर्जरी, कर्करोग उपचार यांसारख्या महागड्या उपचारांसाठी वेळेत व पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

प्रमाणपत्राचे फायदे

  • परदेशी संस्था आणि परदेशात राहणाऱ्या नागरिकांकडून थेट मदत
  • डब्लूएचओसारख्या संस्थांकडून थेट देणगी घेता येईल.
  • परदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांकडून सरकारी खात्यात निधी जमा करता येईल. महागडे उपचार शक्य होतील.
  • अपघात, नवजात बालके, तातडीच्या शस्त्रक्रिया अशा गंभीर प्रकरणात तत्काळ निधीपुरवठा करता येईल.

सीएसआर निधीचा समावेश

अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सीएसआर अंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी निधी देतात. एफसीआरए प्रमाणपत्रामुळे राज्य सरकार त्यांच्याशी थेट करार करू शकते.