
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी रविवारी राज्यातील पावसामागे परकीय हात असल्याचा दावा करत खळबळ उडवली आहे. तसेच ढगफुटी हा कट असल्याचा आरोप केला. बदराचलम जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले.
तेलंगणा राष्ट्र समितीच्या प्रमुखांनी सांगितले की, त्यांच्याकडे माहिती आली आहे की राज्यातील गोदावरी नदीच्या खोऱ्यासह देशातील काही भागात ढगफुटींमागे संशयित ‘परकीय हात’ असू शकतो.
‘ढग फुटणे नावाची एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ती कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही. ज्यांच्याशी आपलं शत्रुत्व आहे ते आपल्या देशात ढगफुटी करत आहेत. पूर्वी त्यांनी कश्मीरजवळ, नंतर लेह लडाखमध्ये, मग उत्तराखंडमध्ये आणि आता आम्हाला माहिती मिळत आहेत की ते गोदावरीच्या प्रदेशात तसे प्रयत्न करत आहेत’. मुख्यमंत्र्यांनी बदराचलम येथील सभेला संबोधित करताना यासंदर्भातील माहिती दिली.
‘कट असो की हवामानातील बदलांमुळे, अशा परिस्थितीत आम्हाला लोकांचे रक्षण करावे लागेल,’ केसीआर म्हणाले.
नंतर, मुख्यमंत्र्यांनी मुलुगु जिल्ह्यातील एतुरु नगरम प्रदेशात हवाई सर्वेक्षण केले आणि तेथील पूर-साहाय्य उपायांचा आढावाही घेतला.




























































