POK लवकरच हिंदुस्थानात असेल – एस. जयशंकर

1161

पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच आहे आणि लवकरच तो हिंदुस्थानात असेल असे वक्तव्य परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. पाकव्याप्त कश्मीरचा भूभाग भौगोलिकदृष्ट्या लवकरच हिंदुस्थानात असेल असे त्यांनी स्पष्ट केले. जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवणे ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब असून हा द्विपक्षीय मुद्दा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाले, त्यानिमित्ताने जयशंकर बोलत होते.

जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचा आहे, तो लवकरच हिंदुस्थानात असेल, असे ठणकावले होते. कश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त कश्मीरबाबत विधान केले होते. पाकिस्तानने बळकावलेला पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात सहभागी करणे, हा सरकारचा पुढील अजेंडा असेल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते. आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही पाकव्याप्त कश्मीर भौगोलिकदृष्ट्या लवकरच हिंदुस्थानात असेल, असे म्हटले आहे. मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कलम 370 बाबतही देशाची भूमिका स्पष्ट केली. कलम 370 रद्द करणे ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब आहे, त्याच्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. हा द्विपक्षीय मुद्दा नसल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘शेजारी राष्ट्रांना प्राधान्य’ हे हिंदुस्थानचे धोरण आहे. मात्र, पाकिस्तान असा शेजारी आहे, जो रोज नव्यानव्या कुरापती काढत समस्या निर्माण करत तणाव वाढवत आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद ही प्रमुख समस्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सार्क देशांशी व्यापर ,संपर्क वाढवण्यावर आमचा भर आहे. कोणता देश सार्क राष्ट्रांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे आणि कोण दहशतवादाला खतपाणी घातल आहे, याचा विचार सार्क सदस्यांनी करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कूलभूषण जाधव यांना कॉउंन्सिलर अॅक्सेस मिळवून देण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आता त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या