
दोन आठवड्यांपेक्षाही अधिक काळ जळकोट शहरात हैदोस घालून 30 ते 40 जणांना चावून जखमी करणाऱ्या माकडाला अनेक प्रयत्नांनंतर वन विभागाने रविवारी जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि :श्वास सोडला आहे. वन विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशी माकडाला जेरबंद केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त होत आहे.
काही दिवसांपासून माकड दिसेल त्याला चावे घेत होता. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर तर माकडाने हैदोस घालत महिला, पुरुष व लहान मुले यांच्यावर हल्ले करीत त्यांना जखमी करण्याचे प्रमाण वाढविले होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. तो शहरातच राहून कोठेही, कोणाच्याही घरात घुसून अचानक चावा घेत असल्याने दिवाळी कशी साजरी करायची? अशी चिंता नागरिकांना भेडसावत होती. वनविभागाकडून स्थानिक नागरिकांना, वन्यजीव तज्ज्ञांना सोबत घेऊन माकडाला जेरबंद करण्यासाठी काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरु होते. एक माकड कमी पडले म्हणून की काय जळकोटमध्ये दोन माकडे दाखल झाली होती. त्यांना पकडण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते पळून जात होते. त्याला काहीही करुन पकडायचेच असा निर्धार करुन तशा प्रकारचा सापळा रविवारी लावण्यात आला. वनपाल एस. एम. कोंपलवार, वनरक्षक व्ही. डी. सुरेवाड, टी. डी. बिरादार, अहमद मुंजेवार, अशोक खंबाळे, हणमंत उदगिरे आदी अधिकारी – कर्मचारी तसेच वन्यजीव – सर्पमित्र संघटनेचे बाबा सय्यद (उदगीर ) व त्यांचे सर्व सहकारी, सर्पमित्र सिद्धार्थ काळे व त्यांचे सर्व सहकारी आदी जणांनी सापळा लावून माकडाला पिंजऱ्यांमध्ये कैद केले आणि मोहीम फत्ते केली. नवीन आलेले एक माकड मात्र पळून गेल्याचे सांगण्यात आले.
याकामात जळकोटचे नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, गटनेते महेश धुळशेट्टे, संग्राम गायकवाड यांच्यासह शहरातील अनेक नागरिकांनी सहकार्य केले. गेले अनेक दिवस छळत असलेला हा माकड अखेर जेरबंद झाल्याने शहरातील भीतीचे वातावरण निवळले आहे. जेरबंद केलेल्या माकडाला वन्यजीव विभाग, येडशी येथे नेऊन सोडणार असल्याचे वनरक्षक व्ही. डी. सुरेवाड यांनी सांगितले.



























































