खासदार संजयकाका यांनी पाच वर्षात काय काम केले? माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा पदाधिकाऱयांच्या बैठकीत सवाल

सांगली लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यपद्धतीवरून भाजप पदाधिकार्यांत खदखद सुरू झाली आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार म्हणून पाच वर्षात काय काम केले? सर्वांना विश्वासात घ्या, अन्यथा भाजपची इतर पक्षांप्रमाणे जिह्यात अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, असे खडेबोल देशमुख यांनी संजयकाका पाटील यांना सुनावले.

पलूस येथे बुथ प्रमुखांच्या बैठकीत भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी संजयकाका पाटील यांना चांगलाच घरचा आहेर दिला. पाच वर्षात खासदारांनी सांगली मतदारसंघात पक्षाचे किती कार्यक्रम घेतले? आम्ही पक्षात काम करत असताना काय चुकलो? आम्ही जिल्हा परिषद आणली, महानगरपालिका आणली आणि तुम्ही बैठक न घेताच खासदारांची उमेदवारी जाहीर केली. याची काय गरज होती?असा सवाल त्यांनी केला.

संघाच्या विरोधात बोलणारा उमेदवार कसा ?

ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्याच खासदारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. इच्छुक असूनही आम्हाला का डावलले गेले, याचे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीने द्यायला हवे? पक्षाच्या विरोधात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलणारा माणूस उमेदवार म्हणून कोणत्या आधारावर जाहीर केला, अशा शब्दांत पृथ्वीराज देशमुख यांनी संजयकाका पाटील यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.