
भाजप नेते, पद्म पुरस्कार विजेते आणि माजी सनदी अधिकारी दया प्रकाश सिन्हा यांनी सम्राट अशोकाची तुलना औरंगजेबाशी केली आहे. सम्राट अशोक हा क्रूर शासक होता आणि तो अतिशय कामुक होता असं सिन्हा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मतावर बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल (संयुक्त)ने आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी पक्षाप्रमाणेच तिथला मुख्य विरोधी पक्ष असलेला राजदही सिन्हा यांच्यावर भडकला असून त्यांच्या नेत्यांनी सिन्हा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. निवृत्त सनदी अधिकारी असलेले सिन्हा हे भाजपच्या सांस्कृतिक विभागाचे राष्ट्रीय संयोजक असून हिंदुस्थानी सांस्कृतिक संबंध परिषदेचे उपाध्यक्षही आहेत. सिन्हा यांना ‘सम्राट अशोक’ या नाटकासाठी 2021 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.
नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राला सिन्हा यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले होते की सम्राट अशोकाबाबतची माहिती गोळा करत असताना त्यांना सम्राट अशोक आणि औरंगजेबामध्ये बऱ्याच समानता दिसल्या होत्या. दोघांनी सुरुवातीच्या काळात बरीच पापे केली आणि नंतर ही पापे लपविण्यासाठी त्यांनी अति धार्मिकतेचा आधार घेतला होता. आपली पापे झाकण्यासाठी त्यांनी लोकांना धर्माकडे झुकण्यास भाग पाडले असं सिन्हा यांचं म्हणणं आहे.
दीपवंश, महावंश आणि अशोकवदन या तीन बौद्ध रचनांमध्ये तसेच तिबेटी लेखक तारानाथ यांच्या लेखामध्ये सम्राट अशोक हा कुरूप असल्याचं म्हटलं आहे, असं सिन्हा यांचं म्हणणं आहे. सम्राट अशोकाच्या चेहऱ्यावर डाग होते आणि सुरुवातीच्या काळात तो कामोत्तेजक होता असंही सिन्हा यांचं म्हणणं आहे. सिन्हा यांच्या या विधानांवर जनता दलाच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने सिन्हा यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही कुशवाहा यांनी केली आहे. जर भाजपने ही कारवाई केली नाही तर भाजपला बरंच नुकसान होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. बिहारमधील विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध मेहता यांनीही सिन्हा यांच्या या विधानांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सिन्हा यांच्याविरूद्ध लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.




























































