
क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना मागील काही वर्षांमध्ये अनेक तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. मिझोरामचा माजी रणजी खेळाडू के लालरेमरूआता असं या खेळाडूचं नाव आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तंदुरुस्त असणाऱ्या या खेळाडूचा मृत्यू झाल्याने मिझोराम क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
मिझोरामचा माजी रणजी खेळाडू के लालरेमरूआता याचा मैदानात खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिझोराममधील ऐझॉल शहरात सिहमुई येथे द्वितीय श्रेणीतील स्पर्धा सुरू होती. 8 जानेवारी रोजी पार पडलेल्या सामन्यात के लालरेमरूआता हा मैदानात खेळण्यासाठी उतरला होता. फलंदाजी करून झाल्यानंतर तंबुत परतत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला सुरुवात झाली आणि तो मैदानातच कोसळळा. त्याला इतर खेळाडूंनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची माहिती मिझोराम क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.


























































