
जगातील सर्वात मोठी लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळलेल्या गुजरातच्या खेळाडूवर राजस्थानमधील मुलीने गंभीर आरोप केले आहेत. पीडित मुलीने या खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने लेखी तक्रार दिली असून राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस स्थानकामध्ये आरोपी खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवालिक शर्मा असे या खेळाडूचे नाव असून कोणत्याही क्षणी त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
पीडित तरुणी 2023 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये गुजरातमधील बडोदा येथे सहलीसाठी गेली होती. तिथे तिची भेट आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या शिवालिक शर्मा याच्याशी झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तासन्तास दोघांच्या फोनवरून गप्पा होऊ लागल्या. त्यानंतर 7 महिन्यानंतर दोघांनी जोधपूर येथे कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकून घेतला.
मे 2024 मध्ये शिवालिक मुलीच्या घरी आला आणि तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. काही काळाने शिवालिकने लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलीला बडोद्याला बोलावून घेतले. पण तिथे शिवालिकच्या आई-वडिलांनी मुलीला चांगलेच फटकारले आणि सर्व संबंध तोडून टाकले.
आमचा मुलगा आयपीएल खेळलेला आहे. त्याला अनेक चांगली स्थळं येत आहेत, असे म्हणत शिवालिकच्या पालकांनी लग्नास नकार दिला. तसेच अपमानित करत घराबाहेर काढले. त्यानंतर पीडित मुलगी जोधपूरला आली. तिने शिवालिकची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट तिलाच धमकावू लागला.
याबाबत कुणाला काही सांगितल्या तुझे नाव खराब करेन, अशी धमकी शिवालिकने दिली. आता याप्रकरणी पीडित मुलीच्या लेखी तक्रारीनंतर शिवालिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक आनंद राजपुरोहित यांनी दिली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही झाली असून कोर्टातील जबाब आणि इतर कायदेशीर बाबींचीही पूर्तता झाली आहे. याप्रकरणी पोलीस शिवालिकचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
शिवालिक शर्मा कोण आहे?
1998 मध्ये जन्मलेला शिवालिक शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदाकडून खेळला आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचेही प्रतिनिधीत्व केले आहे. 2018-19 मध्ये त्याने बडोदाकडून रणजी स्पर्धा खेळली आहे. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने ट्रायलसाठी बोलावले होते. तिथे त्याने सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे त्याची मुंबईच्या संघात निवड झाली. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2025 आधी मुंबईने त्याला रिलीज केले होते.