
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या विकासाला चालना मिळेल, असे तर्कट नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी मांडले आहे. ’ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील नवे संशोधन व नवकल्पनांमध्ये अडथळे येतील आणि हिंदुस्थानला ताकद मिळेल. जगातील प्रतिभावंतांना अमेरिकेने दारे बंद केल्यामुळे प्रयोगशाळा, पेटंट, नवकल्पना आणि स्टार्टअप्सची नवी लाट आता बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि गुरगावच्या दिशेने येईल, असा आशावाद अमिताभ कांत यांनी व्यक्त केला.
ट्रम्प यांच्याकडून पुरती कोंडी
ट्रम्प यांनी एच 1 बी व्हिसाधारकांची पुरती कोंडी केली आहे. त्यांनी एच 1 बी व्हिसाधारकांना व कंपन्यांना वेळच दिलेला नाही. 21 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुल्कवाढीचा नवा निर्णय लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कंपन्यांनी बाहेरच्या देशात असलेल्या आपल्या कर्मचाऱयांना तात्काळ अमेरिकेत बोलावले आहे. मात्र, हिंदुस्थानातून अमेरिकेला विमानाने थेट जाण्यासाठी किमान 15 ते 20 तास लागतात. तर, लंडन, फ्रँकफर्ट किंवा अन्य देशांमार्गे जाण्यासाठी अंतरानुसार 20 ते 30 किंवा त्यापेक्षा जास्त तास लागतात. प्रवासाची तयारी करणे, तिकीट मिळवणे आणि अमेरिकेत पोहोचणे एवढ्या वेळेत केवळ अशक्य आहे.
मस्क, सत्या नाडेला, पिचाई यांचे मौन
एच 1 बी व्हिसाच्या शुल्कवाढीवर जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्यासह मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, गुगलचे सुंदर पिचाई यांनी मौन बाळगले आहे. हे तिन्ही दिग्गज एच 1 बी व्हिसामुळेच अमेरिकेत पोहोचले आणि पुढे नावारुपास आले. कालपर्यंत एन 1 बी व्हिसा अमेरिकेसाठी महत्त्वाचा होता. मस्क यांनी त्यासाठी युद्ध पुकारण्याची धमकी दिली होती. मात्र आता सर्वांनीच मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवे नियम नव्या अर्जदारांसाठी
अमेरिका सरकारने घेतलेला एच 1 बी शुल्कवाढीचा निर्णय नव्याने व्हिसा मिळवणाऱयांसाठी आहे. आधीच व्हिसा मिळवलेल्यांना त्याचा फटका बसणार नाही. तसेच, नुतनीकरण करतानाही त्यांना वाढीव शुल्क भरावे लागणार नाही, असे सूत्रांकडून समजते.
एच-1 बी व्हिसा म्हणजे काय?
एच-1 बी हा अमेरिकेत तात्पुरत्या वास्तव्याचा व्हिसा आहे. त्याद्वारे अमेरिकेत प्रवेशाची परवानगी मिळते. या व्हिसाच्या आधारे अमेरिकी कंपन्यांना बाहेरच्या देशातील एक्सपर्ट मनुष्यबळ आपल्या पंपन्यांमध्ये ठेवता येते. 1990 साली हा व्हिसा सुरू झाला. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रातील उत्तम टॅलेंट अमेरिकेत आणण्याचा उद्देश यामागे होता. अमेरिका दरवर्षी 65 हजार लोकांना एच-1 बी व्हिसा देते. हा व्हिसा सुरुवातीला तीन वर्षांसाठी असतो. गरज भासल्यास तो आणखी तीन वर्षांनी वाढवता येतो.
राहुल गांधी यांचा हल्ला… कमकुवत पंतप्रधान!
अमेरिकेच्या व्हिसा दणक्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपले 2017 चे ट्विट पुन्हा शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘मी पुन्हा सांगतो, हिंदुस्थानला कमकुवत पंतप्रधान लाभले आहेत,’ असे त्यांनी म्हटले आहे.