घराच्या खोदकामादरम्यान सापडली बुद्धाची पुरातन मूर्ती; पुरातत्व विभागाने दिली उत्साह वाढवणारी माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगढ मधील रायपूर – बिलासपूर येथे शुक्रवारी भगवान बुद्ध व पांडव कालीन मूर्ती सापडल्या आहेत. सोंद्रा गावामध्ये घराच्या बांधकामादरम्यान ही मूर्ती सापडली आहे. पुरातत्वीय दृष्टीने या मूर्ती महत्वाच्या असल्याचे समजते. सोंद्रा गावातील दिलेंद्र बंछोर याच्या घराच्या बांधकामा दरम्यान या मूर्ती आढळल्या. प्राचीन मूर्ती आढळल्याचे समजताच पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक विवेक आचार्य यांनी त्या परिसराची पाहाणी करण्यासाठी पथक पाठवले होते.

पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रायपुर – बिलासपुर रोड पासून हे गाव 16 किलोमीटर दुर असून, रायपुरमधील सांकरा या गावापासून जवळपास 2 किमीच्या अंतरावर आहे. घराच्या बांधकामासाठी पाया घालत असताना भगवान बुद्धाची मूर्ती सापडली. अधिकाऱ्यांच्या मते या मूर्तीच्या कपाळावर टिळा आहे. या टिळ्यानुसार ही मूर्ती ध्यानस्थ बुद्ध असण्याची अधिक शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही मूर्ती अपूर्ण असून मूर्तीचा वरचा भाग हा त्रिस्तरीय तंत्राने विकसित करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकारच्या तंत्राने तयार केलेल्या भगवान बुद्धाच्या मूर्ती छत्तीसगढमधील सिरमपूर आणि राजीम तसेच बिहारच्या बोधगयामध्ये देखील सापडल्या आहेत.

उत्खननात सापडलेली ही मूर्ती पांडव कालीन असल्याचे तज्ञांनी सांगितले. या मूर्तीचा कालखंड 6 ते 9 शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तपासादरम्यान इतर मूर्ती सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.