दाबोळी विमानतळावर 22 लाखांच्या विदेशी चलनासह चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

दाबोळी विमानतळावर 22 लाख 30 हजार रूपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात कस्टम विभागाला यश आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी चौघा विदेशी प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पदरित्या वावरत असलेल्या चौघा विदेशी प्रवाशांवर पाळत ठेवली होती. त्यातूनच विदेशी चलनाची तस्करी उघडकीस आली. हे चौघे विदेशी प्रवासी एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहला प्रयाण करण्याच्या तयारीत होते. संशयामुळे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 22 लाख 30 हजार व 610 रूपये किमतीचे विदेशी चलन आढळून आले.

संबंधित हवाई प्रवाशांनी आपण विदेशी चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होतो अशी कबुली अधिकाऱ्यांकडे दिली आहे. हवाई प्रवासा दरम्यान ऐवढी मोठी रक्कम बाळगणे कायद्यानुसार गुन्हा असल्याने कस्टमच्या अयाधिकाऱ्यांनी हे विदेशी चलन जप्त करून चौघाही प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गोवा कस्टमचे अतिरीक्त आयुक्त टी.आर. गजलक्ष्मी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास गोव्याचे कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कस्टम आयुक्त व इतर अधिकारी करीत आहेत.