ईव्हीएम बनविणाऱ्या कंपनीमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून भाजपच्या नेत्यांची नेमणूक, माजी केंद्रीय सचिवांचा आक्षेप

printed-receipt-evm

भारत इलेक्ट्र्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी इलेक्ट्रीक वोटींग मशिनचे उत्पादन आणि वितरण करणारी कंपनी आहे. ही कंपनी या मशिनमध्ये असणाऱ्या चिपसाठीचा गुप्त कोडही तयार करत असते. अशा या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून भाजपच्या 4 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. X या सोशल मीडियावर जागरूक व्यक्तींनी एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला मजकूर पोस्टद्वारे शेअर करत याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

शर्मा यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, सदर मुद्दा मी आयोगाच्या पूर्वीच लक्षात आणून दिला होता, मात्र आयोगाने त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. अशा कृतीतून भाजपला फायदा व्हावा याकडे आयोगाचा कल असावा अशी शंका निर्माण होत आहे.

भाजपचे राजकोट जिल्हा अध्यक्ष मनसुखभाई खाचरिया यांचे उदाहरण देताना शर्मा यांनी आयोगाला प्रश्न विचारला आहे की खाचरिया यांच्या बीईएलचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्तीबद्दल काही आक्षेपार्ह वाटले नाही का ? स्वतंत्र संचालक हे कंपनीच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे माहिती असूनही या बाबीकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा प्रश्न शर्मा यांनी विचारला आहे. आयोगाने सदर प्रकरणी वेळीच कारवाई केली नाही तर आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहील. कारवाई न केल्यास आयोगाची प्रतिमा आणखी डागाळण्याची शक्यता आहे. आयोगाने असा प्रकरणांकडे डोळेझाक करणे हे लोकशाहीसाठी चांगले नाही, असे शर्मा यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.