नगर-बीड राज्यमार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुखेड

नगर-बीड राज्यमार्गावरील पोखरी शिवारात रविवारी सकाळी झालेल्या अपघातात मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील चमकुरे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. मागच्या गुरुवारी यात्रेनिमित्त सावरगाव येथे आले होते. यात्रा संपल्यानंतर ते परत गुजरातकडे जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यातच चौघांचा मृत्यू झाला.

मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील चमकुरे परिवार वास्तव्यास आहे. या चमकुरे परिवारातील काही सदस्य कामाच्या शोधात अनेक वर्षांपूर्वी गुजरात राज्यातील उंबरगाव येथे गेले व तेथेच वास्तव्य करू लागले. यात खुशाल माधवराव चमकुरे हे शिलाई मशीनच्या कंपनीमध्ये काम करीत होते ते आपल्या कुटुंबियांसह त्यांच्या मूळ गावातील श्रीकृष्ण यात्रेसाठी गुरुवार 14 मार्च रोजी एका खाजगी वाहनाने सावरगाव येथे आले होते तसेच त्यांचा उच्चशिक्षित लहान मुलगा योगेश खुशाल चमकुरे याच्यासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही होता. सावरगावची यात्रा संपल्यानंतर 16 मार्च रोजी रविवारी रात्री त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुशिलाबाई खुशाल चमकुरे (55), मुलगा शंकर खुशालराव चमकुरे (35), सून अनुजा शंकर चमकुरे (30), मुलगा योगेश खुशाल चमकुरे (25), पुतण्या नागेश गोविंद चमकुरे (40) नातू अनिकेत शंकर चमकुरे (7) हे सात जण सावरगाव येथून परत गुजरातकडे निघाले होते, मात्र रविवार 17 मार्चच्या पहाटे नगर-बीड रस्त्यावर त्यांच्या ईरटीका कारला ट्रकची भीषण धडक झाली. यात 4 जणांचा मृत्यू झाला. ही बातमी सावरगाव येथे कळताच सबंध गाव शोकसागरात बुडाले असून, या अपघात मृत झालेल्या चमकुरे कुटुंबियाच्या सदस्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी सावरगाव येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.