
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम पारनेर मतदारसंघ वगळता जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात मोहिमेपूर्वी असलेल्या ३८ लाख मतदारांपैकी तब्बल ४ लाख २६ हजार मतदार असंकलित (मयत, दुबार नोंदणी आणि कायमस्वरूपी स्थलांतरित) आढळले आहेत. या सर्व मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गेल्या सव्वा महिन्यापासून १२ विधानसभा मतदारसंघांत विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण ३८ लाख मतदारांपैकी सुमारे ४.२६ लाख मतदार हे असंकलित (मयत, दुबार व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार) असल्याचे आढळून आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या तयार करण्यात आल्या असून, या याद्या स्थानिक मतदारसंघनिहाय मतदान केंद्र सहायक अर्थात बीएलओ (BLO) यांच्याकडे देण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर याद्या मतदारांनी तपासून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. असंकलित मतदारांची यादी स्थानिक पातळीवर सार्वजनिक कार्यालयात प्रसिद्ध करण्यासोबतच जिल्हास्तरीय वेबसाइटवरदेखील प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिली आहे. जिल्ह्याच्या वेबसाइटवर ही यादी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
असंकलित यादीतील मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करता येईल. याशिवाय स्थानिक सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करता येईल. तसेच जिल्हास्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मतदारांची ग्रामीण व शहरी भागातील घर क्रमांकाची माहिती मागविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.
तसेच ज्या-ज्या ठिकाणी शाळेत मतदान केंद्र आहे, त्या सर्व ठिकाणी युडीआयएस (UDISE) कोड देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र सुसूत्रीकरणा अंतर्गत नवीन मतदान केंद्र तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास सादर केला असल्याचीही माहिती उपजिल्हाधिकारी गाढे यांनी दिली आहे.































































