वर्षा सहलीची धमालमस्ती चार तरुणांच्या जीवावर बेतली आहे. खोपोली-चौक मार्गावरील पोखरवाडी येथील तलावात बुडून वांद्रय़ाच्या रिझवी कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एकलव्य सिंह, इशांत यादव, आकाश माने, रनोत बंदा अशी मृतांची नावे आहेत.
एका संस्थेच्या वतीने खोपोली-चौक मार्गावर आणि माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखरवाडीत वर्षा सहल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुंबईच्या विविध भागांतील 37 तरुण, तरुणी एकत्र लक्झरी बसने आले होते. त्यात 17 मुलींचा समावेश होता.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सगळे पोखर तलावात पोहण्यास उतरले. त्यात एकलव्य सिंह, इशांत यादव, आकाश माने, रनोत बंदा हे रिझवी कॉलेजचे चार तरुण तलावाच्या मध्यभागी असलेल्या भोवऱयात अडकले. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे चारही विद्यार्थी 17 ते 23 वयोगटातील आहेत. चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने रिझवी कॉलेजवर शोककळा पसरली आहे.