
नांदेड शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यातच ई-स्क्वेअर परिसरातील खुनाची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासांत शनिवारी मध्यरात्री लोहार गल्लीजवळ धारदार शस्त्राने भोकसून 35 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मनप्रितसिंग परविंदरसिंग काचवाले (23) आणि परमज्योतसिंग परविंदरसिंग काचवाले दोघांना ताब्यात घेतले आहे.
ई-स्क्वेअर परिसरातील तिहेरी खुनाची घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री लोहार गल्ली परिसरात पूर्वीच्या वादामधून रणजितसिंह तबेलेवाले उैर्फ रज्जा (35) याच्यावर दोन हल्लेखोरांनी धारदार तलवारीने सपासप वार केले. घटनेनंतर आरोपी पसार झाले. वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे घटनास्थळी पोहचले, त्यांनी जखमी रणजितसिंहला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचे निधन झाले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज पहाटे यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सलगच्या खुनाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे.




























































