पार्सलसाठी कस्टम ड्युटी भरण्यास सांगून फसवणूक, दिल्लीतून आरोपी महिलेला अटक

प्लेयर ग्लोबल एक्सप्रेस कुरियर सर्व्हिस येथून तुमचे पार्सल आले आहे; परंतु ते पार्सल मिळविण्यासाठी कस्टम फी भरावी लागेल असे लालच दाखवत मलबार हिल येथे राहणाऱ्या एका गृहिणीला 70 हजार रुपयांचा चुना लावण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मलबार हिल पोलिसांनी दिल्लीत जाऊन आरोपी महिलेला बेडय़ा ठोकल्या.

मलबार हिल परिसरात राहणाऱया उर्मिद गुरुबक्ष सिंग (51) या गृहिणीला एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला व तुमचे पार्सल आले असून ते कस्टम डय़ुटी भरून ताब्यात घ्या, असे सांगण्यात आले. प्लेयर ग्लोबल एक्सप्रेस कुरियर सर्व्हिस येथून पार्सल आले असल्याने काहीतर मोठे किंवा चांगले पार्सल असावे असा उर्मिद यांचा भ्रम झाला. त्यामुळे ते पार्सल घेण्यासाठी आरोपीने सांगितल्याप्रमाणे उर्मिद यांनी 70 हजार रुपये अन्य बँक खात्यात ट्रान्सफर केले. पैसे गेल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे उर्मिद यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच मलबार हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक उदयसिंग शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच संदे, धारवाडकर, कदम व मुन्ना सिंह यांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. तेव्हा आरोपी दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने दिल्लीत जाऊन आरोपी महिला दीपिका एम. एन. हिला पकडून मुंबईत आणले. मूळची बंगळुरूची असलेली दीपिका दिल्लीत बसून फसवाफसवी करत होती.