
सामना ऑनलाईन । मुंबई
मोटारसायकल विक्रीच्या नावाखाली सायबर भामटय़ांनी दोघांची फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणूकप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामटय़ांनी फसवणुकीकरिता आता लष्कराच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली येथे राहणारे तक्रारदार हे फेसबुक सर्च करत होते तेव्हा त्यांनी मोटारसायकलच्या विक्रीबाबत जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीखाली नंबर होता. त्या नंबरवर तक्रारदारांनी फोन केला तेव्हा सायबर भामटय़ाने आपले नाव प्रवीणकुमार असून हिंदुस्थानी लष्करात असल्याच्या भूलथापा मारल्या. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्याकरिता भामटय़ाने व्हॉटस्ऍपवर पॅनकार्ड आणि आधारकार्डसह हिंदुस्थानी लष्कराचे ओळखपत्र पाठवल्यानंतर तक्रारदारांनी मोटारसायकल खरेदीस होकार दाखवला.
होकार दाखवल्यावर भामटय़ांनी तक्रारदारांना पेटीएम या ऍप्सद्वारे पैसे पाठवयास सांगितले. त्यांनी पेटीएमवर पैसे पाठवल्यावर पुन्हा भामटय़ाने तक्रारदारांना फोन केला. आपण लष्कराच्या वाहतूक विभागातून बोलत आहोत. लष्करी परिसरातून मोटारसायकल नेण्याकरिता 21 हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरण्यास सांगितले. भारत नावाच्या व्यक्तीने तक्रारदारांना फोन करून पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. 30 हजार रुपयांवर जीएसटी भरावा लागेल अशा भूलथापा मारल्या. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.


























































