सावकारी कर्जात फसवणूक; 1 लाख 20 हजाराच्या कर्जाचे झाले 40 लाख, आरोपीला अटक

एका शासकीय सेवेतील तक्रारदाराने पाच वर्षांपूर्वी आपण सेवेत येण्यापूर्वी मुंबई येथे एक फ्लॅट कर्ज काढून आपल्या नावावर घेतला होता. याच फ्लॅटचे कर्जाचे मासिक हप्ते तो आपल्या मासिक वेतनातून नियमित फेडत होता. परंतु मे 2023 मध्ये आपल्या वेतानातून आयकर कपात झाल्याने त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आपला उदरनिर्वाह तसेच घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते नियमित भरणे शक्य होत नसल्याने होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून त्याने सडामिऱ्या येथे राहणाऱ्या वैभव सावंतला आपली अडचण सांगितली व त्याच्याकडे 1 लाख 20 हजार रूपये मागितले.

वैभव सावंतने आपल्याकडे एवढे पैसे नाहीत,पण आपल्या ओळखीच्या एका मित्राकडून (गोमतेश रा. रत्नागिरी) तुला सावकारी व्याजी पैसे घेऊन देतो, पण त्याचे दरमहा 20% व्याजाने पैसे भरावे लागतील, असे सांगितले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या सरकारी नोकराने त्यालार होकार दिला. 27 मे रोजी वैभव सावंत याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत आपली आर्थिक गरज भागण्याकरिता जयस्तंभ, रत्नागिरी येथील एका वकिलांच्या कार्यालयामध्ये नोटरीवर आपली सही केली. मात्र, नोटरीमधील मजकूर वाचून पहिला नाही. तसेच त्याच्या सांगण्याप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या खात्याचे दोन कोरे चेक सही करुन दिले. वैभव सावंतने ठरलेल्या 1 लाख 20 हजार रूपयांपैकी 80 हजार रोख स्वरुपात दिले व उर्वरित रक्कमेपैकी 20 हजार रूपये वकीलाची फी व 20 हजार रूपये सावकारी व्याजाचा एक आगाऊ हप्ता आहे असे सांगून पैसे काढून घेतले.

सावकारी व्याजाने मिळालेल्या या पैशांचे हप्ते ऑक्टोबर 2023 मध्ये भरण्याकरिता या सरकारी नोकराला उशीर झाल्याने वैभव सावंत याने पुढचा हप्ता जास्त द्यावा लागेल, असे सांगून 25 हजार रोख रक्कम घेऊन ती (गोमतेश रा. रत्नागिरी) यांच्या खात्यात जमा केल्याचे सांगून स्वत:च्याच खात्यात जमा केली. त्यानंतर वैभव सावंत याने व्याजाच्या हप्त्यासाठी या सरकारी नोकराला व त्याच्या कुटुंबीयांना वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. तू गोमतेशला ४० लाख देणे आहेस आणि तसे तू नोटरीमध्ये लिहून दिले आहेस, असे सांगून आपल्याकडे असलेले कोरे चेक बाऊन्स करून तुझी नोकरी घालवणार, अशी धमकी देत मानसिक त्रास देऊ लागला.

या प्रकरणामध्ये प्रत्यक्षात 1 लाख 20 हजार रुपये घेतलेले असताना 40 लाख रुपये घेतल्याचे खोटी नोटरी करून विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे व घेतलेली रक्कम परत करत असूनही कोणताही सावकारी व्यवसायाचे परवाना नसताना अवैध व्याज आकारुन हप्ता देण्यासाठी वारंवार फोन करुन धमकी देऊन मानसिक त्रास दिल्या गेल्याचे लक्षात आल्यावर या सरकारी नोकराने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४६३/२०२३ भा.द.वि.सं. कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ५०६, ३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील आरोपी वैभव राजाराम सावंत (31 वर्षे, रा. राम मंदिर झारणी रोड, ता. जिल्हा रत्नागिरी) याला 5 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यामध्ये तपास पथकाने छापा टाकला असता अनेक महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीने 35 हून अधिक जणांना अशाच प्रकारे अवैध सावकारी कर्ज देऊन नोटरी-करारनामा दर्शवून व्याज घेतले आहे. ज्यात लाखो रूपयांचे व्यवहार प्राथमिक स्वरुपात निष्पन्न होत आहेत.