ऑनलाईनचे पार्सल परत करताना हेराफेरी; तिघांना अटक, 9 मोबाईल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन मोबाईलचे पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून बॉक्समधील मोबाईल बाहेर काढत त्यात साबणाच्या वड्या टाकून पार्सल परत करणार्‍या आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आरोपी संगनमताने हे गुन्हे करायचे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 लाख 61 हेजार रुपये किंमतीचे 9 मोबाईल जप्त केले आहेत. अभिषेक हरिभाऊ कंचार (20, रा. ठाणे), धीरज दीपक जावळे (21, रा. कल्याण), आदर्श उर्फ सनी शिवगोविंद चौबे (25, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत जकी अहमद मुख्तार शेख (39, रा. कात्रज) यांनी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार झॅप इंटरप्राझेस कंपनीचे डायरेक्टर आहेत. तक्रारदारांच्या कंपनीतर्फे ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस एल. टी. डी या कंपनीला डिलीव्हरी बॉयसाठी मनुष्यबळ पुरविले जाते. काही व्यक्ती हे ऑनलाईन महागडे मोबाईल बुक करून पार्सल मागवायचे. मात्र, डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आल्यानंतर त्याला बोलण्यात गुंतवून पार्सल परत करताना फसवणूक करत असल्याच्या तक्रारी तक्रारदारांच्या कंपनीकडे आल्या होत्या.

यादरम्यान अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे शनिवारी सेनापती बापट रस्त्यावरील मॅरीअट हॉटेल परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अंमलदार संदीप साबळे यांना मिळाली. याबाबत गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधारकार्ड बनवायचे. त्यावरून नवीन सिम कार्ड विकत घेऊन ऑर्डर बुक करायचे. ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला एकजण बोलण्यात गुंतवायचा. यावेळेत दोघेजण त्यांच्याकडील कारमध्ये बसून मोबाईलच्या जागी साबणाची वडी पॅक करायचे. पैसे नसल्याचे कारण देत ते पार्सल परत करून कंपनीची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार संदीप साबळे, प्रदीप राठोड, अमोल आवाड, किरण ठवरे, नितीन कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.