हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा प्राणज्योत सोहळा

हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या बलिदान भूमी म्हणून ओळख असलेल्या काळबादेवी रोड (मुंबई) ते जन्मभूमी महाळुंगे पडवळ (आंबेगाव) असा पायी प्राणज्योत सोहळा रविवार (दि. 10) ते मंगळवार (दि. 12) या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी साडे नऊ वाजता पवित्र नद्यांच्या जलाचे कलश पूजन करून प्राणज्योत सोहळ्याला प्रारंभ झाला.

बाबू गेनू यांचा जन्म सन 1908 मध्ये महाळुंगे पडवळ येथे झाला. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या ‘स्वदेशी’ आंदोलनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. दि. 12 डिसेंबर 1930 रोजी विदेशी कपडे घेऊन येणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडविला. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक पुढे नेला, त्यावेळी ते हुतात्मा झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिकारी हुतात्मा म्हणून नोंद झाली. त्यांच्या शौर्याची माहिती तरुण पिढीसमोर यावी म्हणून गेल्या सोळा वर्षापासून प्राणज्योतीचे आयोजन केले जात आहे. या वर्षी तरुण व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्राणज्योत सोहळ्याचे हे 16 वे वर्ष आहे. प्राणज्योत सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका स्मारकात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. रविवारी (दि.10) सकाळी वाजता पवित्र नद्यांच्या जलाचे कलश पूजनाने प्राणज्योत सोहळ्याला प्रारंभ झाला. सोमवार (दि.11) सकाळी नऊ वाजता काळबादेवी मुंबई येथील बलिदान भूमीतून दिपप्रज्वलन करून प्राणज्योत डी. पी. वाडी घोडपदेव येथील बाबू गेनू यांच्या तत्कालीन निवासस्थानी आणण्यात येणार आहे. दुपारी कामगार मैदान परेल, टिळकनगर चेंबूर, अभ्युदय विद्यालय पारसीवाडी हुतात्मा बाबू गेनू बसस्थानक घाटकोपर, सायंकाळी सहा वाजता कामोठे (नवी मुंबई), मंगळवार (ता.12) राजगुरुनगर येथे पहाटे हुतात्मा राजगुरू पुतळा पूजन व मशालफेरी, सकाळी सहा वाजता डिंभे येथे हुतात्मा बाबू गेनू सागर जलपूजन, छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर, एकलहरे, कळंब येथे मिरवणुकीने स्वागत होईल. महाळुंगे पडवळ येथे प्राणज्योतीची मिरवणुकीने सांगता, असा प्राणज्योतीचा मार्ग आहे.