
पुणे जिल्ह्यात रेल्वे पुलाखाली पोपटाची पिल्ले पाहण्यास गुंतवून मित्राला ढकलून देत खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खडकीतील बोपोडी परिसरात घडली आहे. मात्र, नदीपात्रातील गवतामुळे अल्पवयीन मुलाचा जीव वाचला आहे.
स्थानिकांनी बोटीच्या साहाय्याने मुलाला नदीपात्रातून बाहेर काढून पोलिसांना माहिती दिली. नेल्शन एलआरशाम (वय 15) असे वाचलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. डॉर्थी सायमन एलआरशाम ( रा. बोपोडी ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्शन आणि प्रशांत मित्र असून बोपोडी परिसरात राहायला आहेत. शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास प्रशांतने नेल्शनला रेल्वे पुलाखाली पोपटाची पिल्ले आहेत. आपण जाऊन घेऊन येऊ असे सांगितले. त्यामुळे ते दोघेही बोपोडी रेल्वे ब्रीज परिसरात पोपटाची पिल्ले पाहण्यासाठी गेले होते.
त्यावेळी प्रशांतने नेल्शनला पिल्ले पाहण्यास गुंतवून खाली ढकलून दिले. सुदैवाने नदीपात्रातील गवतावर नेल्शन पडल्यामुळे त्याला जखम झाली नाही. नेल्शन जोरजोरात ओरडल्याने स्थानिकांनी बोटीच्या साह्याने त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर खडकी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुडगे यांनी दिली.


























































