
अनुराधा राजाध्यक्ष
रेखा बैजल… मराठी कथाविश्वातील मोठे नाव… विवाहानंतर पंजाबी घरातून त्यांची लेखणी अधिकच तरल झाली… परिपक्व झाली…
प्रत्येकात असतो एक सूर्य. त्याला स्वतःतून उगवू द्यावं आपणच. कारण स्वतःतला सूर्य जेव्हा उगवतो ना तेव्हा मग कोणीच करू शकत नाही अंधार आयुष्यात, अगदी आपण स्वतःसुद्धा स्वतःसाठी. हे माझं मत रेखा बैजल यांच्याशी बोलताना दृढ झालं. आयुष्य रिवाईंड करत परत न्यावं आठवणींच्या अंतिम टोकापर्यंत आणि पुन्हा एकदा जगावं स्वयंपूर्ण. तसंच काहीसं झालं रेखाताई माझ्याशी बोलत होत्या तेव्हा त्यांचं. ‘साठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. वडिलांची बदली व्हायची वेगवेगळ्या खेडय़ात. पावसाळ्यात चार महिने बस येणार नाही आणि चिखलात पाय रुतला की चप्पल हातात येणार, पण पाऊल निघणार नाही, अशा दुरवस्थेतली ती खेडी. तक्रार नव्हती कशाचीच. कारण आयुष्य असंच असतं, असं वाटायचं तेव्हा. वडील बीओडी. ऑफिसरची मुलगी म्हणून खेडय़ातल्या इतर मुली माझ्यापासून जरा अंतर ठेवूनच वागायच्या. त्यातून आलं एकाकीपण. न समजणाऱया वयात ययाती वाचलं गेलं ते त्यामुळेच. खिडकीत बसायचं, निसर्ग पाहायचा, झाडांशीच संवाद करायचा. हळूहळू निसर्गाची मी एक घटक असल्यासारखं वाटायला लागलं मला. वडील अगदी साधे. जातीपाती न पाळणारे. घरात एक अटेंडंट होता. खालच्या जातीतला. सगळीकडे वावरायचा तो घरात. शाळेतल्या मुलींना आश्चर्य वाटून त्या विचारायच्या त्याबद्दल. मग मी तेच प्रश्न बाबांना विचारायचे. तेव्हा ते समजवायचे, जाती-धर्मात अंतर नसतं.’
आयुष्य ही एक अडथळ्याची शर्यत आहे, असं त्यांना लहानपणापासूनच वाटत होतं. शहरी नातेवाईकांनी रेखाताईंचा खेडवळपणा, रापलेला रंग याबद्दल केलेल्या टोचणीमुळे नकोसे असल्याची, न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती त्यांच्यात. स्वतःतल्या राजहंसाचा शोध त्यांना लागला तो गाण्यामुळे.
रेखाताई सांगत होत्या, ‘वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी गाणं गात होते. घरगुती समारंभात हमखास गाणं म्हणायला सांगितलं जायचं, कौतुकही व्हायचं.’ त्या नववीत असताना वडिलांची सोलापूरला बदली झाली आणि संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण त्या घेऊ शकल्या मध्यमा प्रथमपर्यंत. रेडिओ स्टेशनला सिलेक्शन, सुगम संगीतात खूप बक्षिसं. सगळं हवहवसं सुरू झालं होतं आणि त्याच दरम्यान, कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांकडे, रेखाताईंपेक्षा दहा वर्षांनी मोठे असलेले शिवकुमार बैजल यायला लागले. रेखाताई त्या दिवसांमध्ये रमताना म्हणाल्या, ‘विनोद खन्नासारखे दिसायचे ते. मग काय. पडले प्रेमात. माझं गाणं, एकूण व्यक्तिमत्त्व त्यांनाही आवडलं. त्यांचं खानदानी पंजाबी एकत्र कुटुंब. लग्न करायचं ठरवलं आम्ही तेव्हा खूप विरोध झाला. अट घातली गेली, गाणं बंद करण्याची. मी तयार झाले. त्यांचा मोठा वाडा, चुलीवरचा स्वयंपाक, घरात वीस-पंचवीस वयस्कर माणसं, बाहेर जाताना सोबतीशिवाय जायचं नाही, मोठय़ानं बोलायचं नाही, डोक्यावर पदर हवाच. या सगळ्यात स्वत्व विसरू नये यासाठी शब्दांचा आधार घेतला. डोळ्यात चुलीचा धूर जाऊन त्रास व्हायचा म्हणून गॉगल लावून स्वयंपाक करायचे. जवळच वही-पेन असायचं. सुचलं की लगेच लिहायचे. घरातल्या इतर बायका विणकाम, भरतकाम, शिवणकाम करायच्या, तेव्हा माझ्या हातात लेखणी असायची. सासूबाई अतिशय धार्मिक. त्या मला माझ्या लिखाणावरून काहीबाही बोलायच्या. घरोघरी असते तशीच मानसिकता. आपल्यासारखंच सुनेनं जगावं ही त्यांची अपेक्षा, पण नंतर माझी पुस्तकं जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा त्यांनी ती कौतुकानं इतरांना दाखवली हा त्यांचा मोठेपणा.’
दुसऱयांच्या सुरात, न पेलणाऱया पट्टीत गाता गाता आवडते स्वर वर्ज्य करता करता, तर कधी नकोसे तीव्र स्वर लावता लावता बेसूर झालेलं संगीत पुन्हा चढवावं आयुष्याच्या सतारीवर, सुंदर सुरावटीसाठी. असं वाटणाऱया रेखाताई लिहीत राहिल्या. सतत… मानस, अंतरिक्षातील शेजारी, अशब्द असे अनेक कथासंग्रह, विज्ञानकथा, मृत्यू जगलेला माणूस, अग्निपुष्प, युगावर्त, जलपर्व अशा अनेक कादंबऱया, नाटक, एकांकिका, चित्रपट… असा लेखनाचा वटवृक्ष म्हणूनच तर अस्तित्वात आला. अनेक पुरस्कारांचा साज चढला त्यांच्या साहित्यावर. मराठवाडा साहित्य परिषदेचं अध्यक्षपद, आकाशवाणी, दूरदर्शन यावर कथाकथन, कविता, नभोनाटय़ प्रसारण, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलगू साहित्यात रेखाताईंच्या साहित्याचे भाषांतर, बी.ए., एम.ए. अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्यकृतींचा समावेश. रेखाताईंचा स्वतःला सिद्ध करण्याचा निग्रह प्रत्यक्षात आला, हे सिद्ध करणाराच हा त्यांचा प्रवास. बहुतेकदा स्त्रियांकडूनच तडजोडीची कशी अपेक्षा ठेवली जाते याची प्रचीती रेखाताईंच्या बोलण्यातून येत गेली, पण शिवकुमारांची साथ त्यांना सतत मिळाली. घरातल्या छोटय़ा मोठय़ा वादात त्यांनी रेखाताईंची बाजू उचलून धरली. गाणं सोडावं लागलं, लेक्चरर होता आलं नाही या गोष्टींचा उणेपणा, शिवकुमार यांच्या साथीनं बोचला नाही. 10-12 वर्षे त्यांनी एकत्र कुटुंबात काढली आणि मग जालन्यात दुसरं घर घेतलं.
रेखाताई म्हणाल्या, ‘लिहिलेलं प्रकाशित होणं गरजेचं होतं. वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून अनुदानासाठी अर्ज केला आणि ते मिळालं. गोनीदांचं पत्र आलं होतं पुस्तक वाचून. ‘रेखाबाई’ अशी पत्राची सुरुवात होती. शिवकुमारांनी सांगितलं तेव्हा कळलं की, हे मोठय़ा माणसाचं पत्र आहे. नंतर गोनीदांना भेटले. माझ्या पुढच्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावनाही दिली. शिवकुमारांचं हस्ताक्षर खूप छान. सुरुवातीला माझ्या कथा फेअर करायचं काम तेच करायचे आणि आता अग्निपुष्प या तिसऱया महायुद्धावरच्या कादंबरीचा हिंदी अनुवादही त्यांनीच केला आहे. सहप्रवासी म्हणून त्यांची साथ मला नेहमीच मिळाली. ‘मौत से जिंदगी की ओर’ला त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तो मिळणारच हे त्या पहिल्यापासूनच म्हणायच्या’ असं त्यांनी सांगितलं. सासरच्या हिंदी वातावरणाचा हिंदी लिखाणासाठी उपयोग झाला का असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘50 टक्के उपयोग झाला, पण सासरच्या भाषेवर, हैदराबादचं उर्दू आणि मराठवाडय़ातल्या मराठीचा प्रभाव होता. लखनऊ, उत्तर हिंदुस्थानी किंवा मध्य प्रदेशातल्या तुलनेत ते ग्राम्य हिंदी होतं. ‘हमें नहीं चाहिये’ याऐवजी ‘हमको नहीं होना’ असं हिंदी बोललं जायचं त्या घरात. हिंदी लेखन करताना मराठी-हिंदी शब्दकोश घेऊन बसायचे मी.’ जमीन अस्मानाचं सांस्कृतिक अंतर असणाऱया माहेर आणि सासरच्या घरांमधून झालेला रेखाताईंचा लेखन प्रवास ऐकताना वाटलं, ज्याच्याशिवाय जगूच शकत नाही अशा प्रिय व्यक्तीशी आयुष्य जोडताना आयुष्यात प्रिय असणारं गाणं जेव्हा सोडून द्यावं लागलं आणि सतत डोक्यावरच्या पदरआड स्वतःला झाकताना स्वतःचं स्वत्व टिकावं यासाठी जेव्हा लेखणी घट्ट पकडून ठेवावीशी वाटली, तेव्हा स्वतःची घुसमट व्यक्त करण्याआधी तिसरं महायुद्ध, विज्ञानकथा, वेद आणि उपनिषदं याच्यावर लिहून, दुःखाची प्रचंड व्याप्ती अनुभवत, व्यक्तिगत पातळीवर होणारी कुतरओढ जगणं सोपं केलं असावं त्यांनी.
अर्थात त्यांच्या कवितांमधून त्यांचं जगणं सामोरं येतंच आपल्या. मी कधी कधी शमीच्या हवाली करते माझं स्त्रीत्व आणि निघते एका अज्ञातवासी प्रवासासाठी असं म्हणत स्वत्वातल्या अणुशक्तीची ओळख करून देणारी त्यांची कविता. झोपडीबाहेर बसलेल्या बाईच्या चेहऱयावर विवंचना पार करणारा आत्मविश्वास पाहून स्वतःच्या दुःखापेक्षा कर्तृत्वाला मोठं करण्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणाऱया रेखाताई. त्या म्हणाल्या, ‘माझ्या लिखाणातलं तत्त्वज्ञान वाचून शंकर सारडांनी सुचवलं मला वेद उपनिषदांवर लिहायला. युगावर्तचा जन्म त्यातूनच झाला. मराठवाडय़ात पाणी प्रश्न भयंकर. तीन-तीन हंडे घेऊन जाणाऱया गरोदर बायका पाहून त्यावर लिहिल्याशिवाय राहवलंच नाही मला. नुसती समस्या मांडून मी थांबले नाही, तर नद्याजोडणी प्रकल्प जलपर्वमध्ये मांडला. जलतज्ञ माधवराव चितळे यांचं त्यासाठी मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या घराची एक भिंत तिसऱया महायुद्धातल्या लोकांच्या आयुष्याची, दुसरी भिंत वेद-उपनिषदांमधल्या विचारांची, तिसरी अनाथालयातल्या मुलांच्या आयुष्याची आणि दरवाजा, सगळ्या विश्वाला आमंत्रण देत स्वागतोत्सुक उघडा आहे, असं त्यांना वाटतं. या दरवाजातून मला त्यांच्या मनाच्या घरात शिरता आलं, जो अनुभव, आत्मभान जागवणारा, आत्मबळ वाढवणारा आणि वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखाला छोटं करण्याइतकं मोठं होण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.





















































