हाँगकाँग-सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी मसाल्यांवरील बंदीनंतर FSSAI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सीलबंद मसाले तपासण्यासाठी आणणार नवी पद्धत?

mdh-everest-indian-spices

हाँगकाँग आणि सिंगापूरमधील काही हिंदुस्थानी मसाल्यांच्या विक्रीवरील बंदीमुळे हिंदुस्थानच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड शोधण्यासाठी एक नवीन पद्धत आणण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जंतुनाशक म्हणून मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रसायन, इथिलीन ऑक्साईड हे कार्सिनोजेनिक म्हणून ओळखले जाते. इथिलीन ऑक्साईड आढळल्यानंतर हाँगकाँग आणि सिंगापूरने MDH आणि एव्हरेस्ट या हिंदुस्थानी मसाला दिग्गजांच्या अनेक उत्पादनांवर बंदी आणली आहे.

सूत्रांनी सांगितले की, ही पद्धत अधिक अचूक आहे आणि ICAR-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स – अन्न सुरक्षा नियामकाच्या राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळेने प्रमाणित केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन पद्धतीचा वापर इतर देशांमध्ये आयात केलेल्या, परदेशातून निर्यात केलेल्या आणि देशांतर्गत वापरासाठी उत्पादित केलेल्या उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड शोधण्यासाठी केला जाईल.

सूत्रांनी माहिती दिली की, ही पद्धत पॅकेज केलेल्या वस्तूंमध्येही इथिलीन ऑक्साईड शोधू शकते. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी मसाल्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, बाजार आणि मसाल्यांच्या कारखान्यांमधून 1,500 हून अधिक नमुने गोळा केले गेले आणि प्रयोगशाळेच्या चाचण्यांसाठी पाठवले गेले.