सराईत फरार गुन्हेगाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरासह ग्रामीण भागात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे करणाऱ्या फरार सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे असे 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

दत्ता अशोक शिंदे (24, रा. राहू, दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर खुनाचा प्रयत्न करून फरार झालेला सराईत कात्रजमधील दत्तनगरमध्ये थांबल्याची माहिती पोलीस अमंलदार योगेश सुळ आणि अमोल सोनटक्के यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अशोक शिंदेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे, संतोष खताळ, योगेश सुळ, अमोल सोनटक्के यांच्या पथकाने केली.