अनेक विद्यार्थी पदवी प्रवेशाविना, पुन्हा प्रवेश नोंदणी; २४ ऑगस्टला चौथी गुणवत्ता यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या तीन गुणवत्ता याद्या जाहीर होऊनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. या विद्याथ्र्यांसाठी येत्या 24 ऑगस्टला चौथी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी विद्यापीठाने प्रवेश पूर्व नोंदणी पुन्हा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना 21 ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे.

मुंबई विद्यापीठाने पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे वेळापत्रक 5 ऑगस्ट रोजी जाहीर केले. आतापर्यंत 3 गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या आहेत या याद्यांनंतरही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने प्रवेश पूर्व नोंदणी अर्ज भरण्याची लिंक पुन्हा खुली केली आहे. विद्यार्थाना 21 ऑगस्ट, सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयांनीही विद्यार्थाना प्रवेश नोंदणीची लिंक खुली करून द्यावी अशा सूचना विद्यापीठाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौथी गुणवत्ता यादी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया 24 ते 25 ऑगस्टदरम्यान होणार आहे.