
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे अक्षरशः बारा वाजले आहेत. प्रथम सत्र संपून दिवाळीची सुट्टी तोंडावर आली तरी शेकडो विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेशच मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी पालकांसह ‘ऑन द स्पॉट’ प्रवेशासाठी चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली, पण येथील नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थी-पालकांना बसला. तहानभूक विसरून प्रचंड उकाड्यात शेकडो विद्याथी पाच ते सहा तास रांगेत ताटकळत उभे होते. या विद्यार्थ्यांना कॉलेजमधील रिक्त जागांनुसार ऑनलाइन प्रवेश देण्यात येत आहेत.
आतापर्यंत अकरावीत कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून या विद्यार्थ्यांना 17 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यालयात अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला असून विद्यार्थी राहत असलेल्या भागातील कॉलेजमध्ये रिक्त जागांनुसार त्याला प्रवेशाची संधी दिली जात आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयात सकाळी 7 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी रांगा लागल्या आहेत. सकाळी 10.30 वाजता रांग हळूहळू पुढे सरकू लागली. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कर्मचारी आणि विद्यार्थी-पालकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकारानंतर काही पालकांनी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दुपारी 12 वाजेपर्यंत ते कार्यालयात हजर नव्हते, असे काही पालकांनी सांगितले.


























































