
सामना प्रतिनिधी । मुंबई
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या शर्यतीत 95 व त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेले एकूण 1 हजार 487 विद्यार्थी असून यातील सर्वाधिक 1186 विद्यार्थी हे सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई बोर्डाचे आहेत. तोंडी परीक्षांचे गुण नसल्याचा फटका बसल्याने 95 व त्यापेक्षा जास्त टक्क्यांवरील एकूण विद्यार्थ्यांमध्ये एसएससी बोर्डाचे केवळ 301 विद्यार्थीच आहेत. त्यामुळे मुंबईतील नामांकित कॉलेजच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक बोलबाला हा बिगर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचाच असणार हे आता स्पष्ट झाले आहे.
अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार होती, मात्र विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ही यादी अचानकपणे रात्री 11 वाजता अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर झळकली. यादी जाहीर होईपर्यंत विद्यार्थी हवालदिल झाले होते. या यादीनुसार विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या शर्यतीत आपण कोणत्या स्थानावर आहोत हे समजणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील आपले गुण, जात संवर्ग, विशेष आरक्षण आदी माहिती तपासणे आवश्यक आहे. या माहितीत काही बदल असल्यास ते बदल करणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे.
रविवारीही दुरुस्ती अर्ज स्वीकारले जाणार
ऑनलाइन अर्जात काही बदल होत असल्यास विद्यार्थ्यांनी बदलास आवश्यक असलेली योग्य प्रमाणपत्रे घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नीरोड येथे 8 जुलैपर्यंत संपर्क साधायचा आहे. रविवार सुट्टीच्या दिवशीही हे कार्यालय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू राहणार आहे. या मुदतीनंतर आलेल्या अर्जात बदल होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 12 जुलै रोजी जाहीर होणार आहे.
एचएसव्हीसी या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे पाठ
90 टक्क्यांपर्यंत गुण मिळालेल्या एकाही विद्यार्थ्याने एचएसव्हीसी या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी यंदा ऑनलाइन अर्ज केलेला नाही हे विशेष. 80 ते 89.99 टक्के गुण मिळालेल्या केवळ 17 विद्यार्थ्यांनीच या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला असून यातील 16 विद्यार्थी हे एसएससीचे बोर्डाच आहेत तर एक विद्यार्थी हा सीबीएसई बोर्डाचा आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा कल सायन्सकडे
यंदाच्या अकरावी प्रवेशात गुणवंत विद्यार्थ्यांचा कल सायन्स शाखेकडे जास्त असल्याचे दिसत आहे. 95 व त्यावरील गुण मिळालेल्या सर्वाधिक 804 विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेसाठी अर्ज केला आहे. त्याखालोखाल कॉमर्स 526 आणि आर्टस् शाखेसाठी 157 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 90 ते 94.99 तसेच 80 ते 89.99 टक्केवारी असलेल्या सर्वाधिक अनुक्रमे 3 हजार 544 आणि 12 हजार 879 विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेसाठीच अर्ज केले आहेत. यात कॉमर्ससाठी अनुक्रमे 2 हजार 517 आणि 10 हजार 319 विद्यार्थ्यांचे तर आर्टस् शाखेसाठी अनुक्रमे
546 आणि 1 हजार 711 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत.
95 व त्यापेक्षा जास्त
टक्केवारी असलेले विद्यार्थी
एसएससी 301
सीबीएसई 425
आयसीएसई 756
आयजीसीएसई 5
एकूण 1487
शाखानिहाय आलेले अर्ज
आर्टस् 17,301
कॉमर्स 1,17,275
सायन्स 49,543
एचएसव्हीसी 1354
एकूण 1,85,473





























































