गडचिरोलीच्या जंगलात घमासान, चकमकीत आठ नक्षल्यांचा खात्मा

फाईल फोटो

देशात दहशतवादासह नक्षलवाद गंभीर समस्या आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण यंत्रणा सज्ज झाल्या असून, घातपात टाळण्यासाठी शोध मोहीम सुरू केल्या आहेत. यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षल्यांचा खात्मा केला आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असून, नक्षलावाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये आगामी काळात लोकसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका राज्यात पाच टप्प्यांत होणार असून, यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच दिवशी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी किंवा दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांकडून मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क झाली होती. कोरचोली चकमकीनंतर बिजापूर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांसोबत घटनास्थळावरून एके 47 व एलएमजी आणि एन्साससारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस दल अजूनही जंगलात असून, परिसरात शोध सुरू आहे.

नक्षलवाद्यांवर 43 लाखांची बक्षिसे

गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले. या सर्व नक्षलवाद्यांवर प्रशासनाने जवळपास 43 लाखांची बक्षिसे जाहीर केली होती. यामध्ये जहाल नक्षलवाद्यांच्या शोधासाठी अनेक दिवसांपासून पोलीस वाट पाहत आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये केलेल्या या कारवाईचे सर्व ठिकाणाहून कौतुक होत आहे.