गडचिरोली – पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली, 100च्या वर गावांचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिल्ह्यात बरसणाऱ्या संततधार पावसामुळे पर्लकोटा नदीची पातळी वाढून पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. मध्यरात्री अचानक पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं.

मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. भामरागड तालुक्यात तीन नद्या असल्याने दरवर्षीच पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. येथील पर्लकोटा नदीवर काल सायंकाळच्या दरम्यान पाण्याची पातळी वाढली होती. मध्यरात्री अचानक पाणी वाढल्याने भामरागडच्या बाजारपेठेत पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

सध्या भामरागड तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेली असून प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. लाहेरी गावात सुद्धा पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सर्व परिसर जलमय झाला आहे. रात्री अचानक पाणी वाढल्याने लोकांना काहीच कळू शकले नाही. पहाटे सर्व परिसर जलमय झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती आहे. वाहतूक ठप्प झाली आहे, प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.