गडनदी धरण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाने एक दोन दिवसांचा अपवाद वगळता संततधार सुरुच ठेवली असल्याने संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून सध्या धरणात ६४ द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने नदीतील पाण्यात वाढ झाली आहे.

गडनदी धरण भरुन वाहू लागल्याने नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदी किनारी गावांना सतर्कतेच्या सुचना जारी केल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यास शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वत: सह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये पडलेल्या दमदार पावसातच गडनदी धरण भरल्याने, पावसाचे पुढील तीन महिने धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरुच राहाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरु पाहत आहे. धरणात क्षमतापुर्ण पाणीसाठा सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र या धरण प्रकल्पातून प्रस्तावित असलेली १:२५ मेगावॅट विज निर्मिती अद्याप सुरु झालेली नाही तसेच ३१०० एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन असतांना कालव्यांच्या कामे अद्यापही अपूर्ण असल्याने एक एकर क्षेत्रही अद्याप ओलिताखाली आलेले नाही हे या प्रकल्पाचे दुर्दैवी वास्तव आहे.