
‘गजानना अवलीया, अवतरले जग ताराया’ आणि ‘गण गण गणात बोते’च्या गजरात संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव शनिवारी हजारो भाविकांच्या साक्षीने उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. 22 फेब्रुवारी 1878 रोजी संत गजानन योगी शेगावमध्ये प्रगटले. त्याला आज 142 वर्षे पूर्ण झाली. तो दिवस प्रगटदिन म्हणून संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
या उत्सवासाठी राज्यभरातून काल सायंकाळपर्यंत 1200 दिंड्या आणि हजारो भाविक या उत्सवासाठी संतनगरीत दाखल झाले आहेत. संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्याहस्ते यागाची पूर्णाहुती देण्यात आली. त्यानंतर हभप श्रीरामबुवा ठाकूर परभणी यांचे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन झाले आणि त्यानंतर श्रीच्या पालखी सोहळ्यास सुरूवात झाली. यावेळी अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रगटदिन सोहळ्यामुळे संतनगरी भक्तीमय झाली होती. शेगावात या उत्सवासाठी राज्यभरातून देश, विदेशातून ‘श्री’चे भक्त दाखल होतात. यावर्षीचा संत गजानन महाराज यांचा 142 वा प्रगटदिन उत्सव देखील संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाला. सकाळी 10 वाजता महारुद्र स्वाहाकार यागाची अवभृतस्नान व यागाची पूर्णाहती झाल्यानंतर प्रकटदिनानिमित्त कीर्तन झाले. त्यानंतर ‘श्री’ची पालखी नगरपरिक्रमेस दुपारी 2 वाजता सुरूवात झाली. पालखीत ‘श्रीचा रजत मुखवटा ठेवण्यात आला. विधिवत पूजन संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रथ, मेणा, गज अश्वासह, श्रीची पालखी मंदिरातून नगर परिक्रमा काढण्यात आली. ही पालखी लहुजी वस्ताद चौक, शिवमंदीर, शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर येथील श्रीचे प्रकटस्थळ, माळी पुरा, आठवडी बाजार बसस्थानक, अग्रसेन चौक, शिवाजी चौक, मेन रोड, गांधी चौक या मार्गे पालखी पुन्हा मंदिरात पोहचली. यावेळी श्रींची महाआरती करुन त्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना चहा, नास्ता, फराळ आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
रविवारी काल्याच्या किर्तनाने प्रकटदिन उत्सवाची सांगता करण्यात येईल. नगर परिक्रमेदरम्यान अनेकांनी ‘श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी शेकडो भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती. या दिंडी मिरवणुकीचे शहरात भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. पालखीतील भाविक आणि वारकर्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, सरबत व फराळाची सेवाभावी संस्थेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. ‘गण गण गणात बोते’ आणि ‘जय गजानन’ च्या जयघोषात संतनगरी दुमदुमली होती. मंदिरात दर्शनासाठी 3.30 ते 4 तासाचा अवधी लागला. भक्तांचे दर्शन लवकर व्हावे यासाठी संस्थानकडून रात्रंदिवस मंदिर खुले ठेवण्यात आले होते. शहरात दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चौकाचौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रगटदिन महोत्सवानिमित्त वर्धा येथील रांगोळी संयोजन रमन आर्ट परिवाराच्यावतीने संपूर्ण पालखी मार्गावर आकर्षण अशी रांगोळी काढून श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. रांगोळीच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक बंदी, स्वच्छता संदेश देण्यात आला. या उत्सवामध्ये राज्यातील 17 जिल्ह्यातून एकूण 1244 भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. या दिंड्यांपैकी 11 जिल्ह्यांमधून 211 दिंड्या पायी आल्यात. श्री क्षेत्र शेगांव वारीच्या या वाटचालीमधील प्रवासामध्ये भजनी दिंड्यांचे मुक्कामाचे ठिकाणी तेथील ग्रामस्थांनी उत्साहपूर्वक स्वागत करून त्यांची भोजन व निवासाची व्यवस्था मंदिर, शाळा, मंगल कार्यालय आदि ठिकाणी उत्तमप्रकारे केली होती. श्री संस्थानद्वारे उत्सवामध्ये सहभागी झालेल्या या भजनी दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या 110 भजनी दिंड्यांना 10 टाळजोड, 1 मृदंग,1 विणा, 1 हातोडी, 4 पताका व संत वाङ्मय ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा, श्री एकनाथी भागवत अशा साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दरूस्ती करीता अंशदान (मदत) व उत्तेजनार्थ बक्षिस सुद्धा वितरीत करण्यात आले. या सर्व दिंड्यांमध्ये एकूण 52,939 वारकरी सहभागी झाले होते.



























































