गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव, गुरूवारी होणार सांगता; शेगावात हजारो भाविकांची मांदियाळी

श्री संत गजानन महाराजांचा 113 वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आज भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे 20 सप्टेंबर रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या निनादात, गजाननाच्या नामजप करत मोठ्या उत्साहात धार्मिक प्रथा परंपरेनुसार संपन्न झाला. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने राज्यातील 528 भजनी दिंड्या व एकूण 17,230 वारकरी भाविक भक्तांची मांदियाळी संतनगरी शेगावात श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी आज श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होण्यासाठी संत नगरीत शेगावात जमली होती.

जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, मंत्राचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात संपूर्ण शेगाव गजाननमय झाले होते. आजच्या या श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी राज्यभरातून पन्नास हजाराच्या वर भाविक भक्त संतनगरीत दाखल झाले होते व त्यांनी श्रींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. भाविक भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण विदर्भ पंढरी गजाननाच्या नाम घोषाने दुमदुमली होती. श्रींच्या समाधी दर्शनासाठी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शन बारी मध्ये भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

‘मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच।’ या संत गजानन महाराजांच्या वचनावर श्रध्दा ठेवत आज श्रींच्या पुण्यतिथी दिनी राज्यातील हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला हजेरी लावली. श्री पुण्यतिथी उत्सव 16 ते 20 सप्टेंबर पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी काकडा, गाथा भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात ह.भ.प. सुनिल बुवा शिंगणे, देऊळगांव मही, ह.भ.प. अनिरूद्ध बुवा क्षिरसागर, सावरगांव, ह.भ.प. गणेश बुवा हुंबाड, महागांव, ह.भ.प. पंडीत बुवा क्षिरसागर, क्षेत्र आळंदी, ह.भ.प. भरत बुवा म्हैसवाडीकर, म्हैसवाडी आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले. श्री गणेशयाग व वरुणयागास भाद्रपद शु. 1 ला प्रारंभ होवून भाद्रपद शु. 5 ला 20 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 10 वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच श्रींचे समाधि सोहळ्या निमित्य श्रीहरी कीर्तन होऊन कार्यक्रम संपन्न झाला. गेल्या पाच दिवसापासून श्री गजानन महाराज मदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते आज श्री गजानन महाराज संस्थानमध्ये 20 सप्टेंबर रोजी ‘श्रीं’चा 113 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 श्रींचे समाधि सोहळ्या निमित्त ह.भ.प. भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन झाले.

श्रींच्या पालखीची नगर परिक्रमा
दुपारी 4 वाजता श्रींच्या पालखीची नगर परिक्रमेसाठी श्री संस्थांच्या प्रांगणातून श्रींची पालखी निघाली तत्पूर्वी ‘श्रीं’च्या रजत मुखवट्याचे विधीवत पुजन श्रींचे सेवाधारी ब्राह्मण वृद्धांच्या मंत्रोपचारात करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा निघाली. ‘गजानन अवलिया अवतरले जग ताराया’, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठलाच्या नामाघोष करीत श्रींच्या पालखी समवेत रथ, मेणा, टाळकरी वारकरी पताकाधारी, अश्वासह ताळमृदंगाच्या गजरात श्रींची पालखी नगर परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली.

सांयकाळी श्रींची पालखी मंदिरात आल्यावर महाआरती करण्यात आली व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. नंतर श्रींची आरती झाली व सायंकाळी रात्री 8 ते 10 कीर्तन ह.भ.प. श्री भरत बुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन झाले. तर 21 सप्टेबर गुरुवार रोजी या श्रींच्या 113वा पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे. सकाळी 6 ते 7 ह.भ.प. श्रीधरबुवा आवारे यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहिहंडी गोपालकाला होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.

यावर्षी श्री पुण्यतिथी उत्सवांत 528 दिंड्या व एकूण 17,230 वारकरी येऊन गेलेत. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण 132 नविन दिंड्यांना 10 टाळ, 1 विणा, 1 मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या, जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकर्‍यांची भोजनप्रसादाची व्यवस्था विसावा संकूल येथे करण्यात आली. तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा समाधि उत्सव संपन्न होऊन दीड लाख भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अशारितीने श्रीकृपेने वारकर्‍यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे, असे श्री संस्थानतर्पेâ कळविण्यात आले.

‘श्रीं’च्या पुण्यतीथी उत्सव काळात भक्तांची गर्दी लक्षात घेता, श्रींच्या दर्शनासाठी एकेरी मार्ग करण्यात आला होता. त्यात श्रींची समाधी दर्शन व्यवस्था, श्री मुखदर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था संस्थांनच्या वतीने करण्यात आलेली होती. श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्य 20 सप्टेंबर रोजी श्रींची पालखी परिक्रमा अश्व व भजनी दिंडीसह दुपारी 4 वाजता श्री मंदिर परिसरातून निघाली. श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील सेवाधारी प्रसादालय जवळील उत्तर द्वारातून, महात्मा फुले बँके समोरुन, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर जवळून, भिम नगर (तिन पुतळा परिसर), शाळा नं.2 (सावित्रीबाई फुले चौक), फुले नगरातून श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, लायब्ररी जवळून (श्री गर्गाचार्य मंदिरा समोरुन), पश्चिम गेटमधून श्री मंदिर परिसरामध्ये सायं. 6.30 वाजताचे परत येऊन आरती करण्यात आली आहे.

श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व फुलांचे तोरण लावण्यात येऊन भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

श्री गजानन सेवा समिती
श्री गजानन सेवा समिती शेगाव, नागपूर, अकोट यांच्यावतीनेही महाप्रसाद वाटप करण्यात येते. दोन दिवस दिवसभर महाप्रसाद वितरण करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. पुण्यतिथी महोत्सवासाठी गर्दीचा अंदाज घेता जादा वाहतूक अतिरिक्त एसटी बसेस चे नियोजन शेगाव आगाराच्या वतीने करण्यात आले होते.