शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले

कोरोनामुळे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर 17 मार्च 2020 पासून शासनाच्या निर्देशानुसार भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने मंदिरांसह धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आधारे 17 नोव्हेंबर मंगळवार पासून श्री गजानन महाराजांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

भाविकांना ई-पासद्वारे श्रींचे दर्शन घ्यावे लागणार आहे. मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये, तसेच दर्शनासाठी येत असतांना शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. श्री भक्तांनी दर्शनासाठी येतांना ई-दर्शन पास व आधार कार्ड सोबत आणावे. ई-दर्शन पास ही श्री गजानन महाराज संस्थानच्या अधिकृत www.gajananmaharaj.org वेबसाईट वरून आपल्या किंवा दुसऱ्याच्या स्मार्ट फोन, इंटरनेट कॅफे, सेतुद्वारे उपलब्ध करून घ्यावी. पास काढतांना काही तांत्रिक अडचण आल्यास 9529658074 / 8766573487 या मोबाईल क्रमांकांवर 24 तास संपर्क करता येईल.

श्रींच्या दर्शनासाठी जात असतांना तोंडाला मास्क, दुपट्टा किंवा गमछाचा वापर करावा. तसेच हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती इत्यादी पुजेचे साहित्य सोबत आणू नये. दर्शनास आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर थर्मल स्क्रिनिंग व हात सॅनिटाईज करावे. कोणत्याही मूर्तींना, आजुबाजुला असलेल्या भिंतीला स्पर्श आणि ग्रंथाचे पारायण करू नये. 6 फुटांचे सामाजिक अंतर ठेवावे. मंदिरामध्ये शासनाचे निर्देशानुसार 10 वर्षांच्या आतील मुले व 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला तसेच रेड, कन्टेन्मेट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये .

नियमाप्रमाणे ई-पासधारक भाविकांना दर्शनाची सुविधा दररोज उपलब्ध राहील. ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट फोन किंवा अॅन्ड्रॉईड फोनव्दारे ई-दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी मंदिरात येतांना ई-पासचा आय.डी. क्रमांक व आधारकार्ड सोबत आणावे. श्री दर्शनार्थी भाविकांनी ई-दर्शन पास काढताना आधार कार्डवरील पत्ता नोंदविणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वतः भाविकांवरच राहणार आहे. तरी भक्तांनी आपले सुरक्षा हेतु मोबाईल मध्ये “आरोग्य सेतु अॅप” जतन करून ठेवावा. श्रींचे दर्शनासाठी बाहेर गांवाहून येणाऱ्या भाविक भक्तांकरीता श्री संस्थानच्या भक्तनिवास संकुल, विसावा भ.नि. संकुलमध्ये तुर्तास निवास व भोजनप्रसादाची नियमानुसार व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु महाप्रसाद तुर्तास बंद ठेवण्यात आला आहे, असे आवाहन श्री ग.म.संस्थानकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या