वीस कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण, कुख्यात गज्या मारणेसह साथीदारांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणेसह त्याच्या साथीदारावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या ताब्यातून व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली असून गुंड मारणेच्या चार साथीदारांना अटक केली आहे. तर, मारणे याचा शोध सुरू आहे.

गजानन ऊर्फ गज्या पंढरीनाथ मारणे, रूपेश कृष्णराव मारणे (दोघे. रा. कोथरूड), सचिन ऊर्फ पपू दत्तात्रय घोलप (रा. धनकवडी), हेमंत बालाजी पाटील (रा. सांगली), फिरोज महंमद शेख, अमर किरदत्त (रा. दोघे. सातारा) आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील घोलप, पाटील, फिरोज आणि अमर कीरदत्त यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 33 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये हेमंत पाटील नावाच्या व्यक्तीने फिर्यादीच्या शेअर ट्रेडिंग मध्ये 4 कोटी लावले होते. मात्र, काही कारणाने फिर्यादी यांचा व्यवसाय तोटय़ात गेल्याने पैसे देणे शक्य झाले नाही.