मं. गो. राजाध्यक्षांचे माय रूट फ्रेंडस्

>> प्रा. डॉ. गजानन शेपाळ

जेजेच्या उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता या पदावर राहिलेले प्रा. मं. गो. राजाध्यक्ष सर. त्यांच्या कार्यकाळात सर त्यांना गवसेल त्या वेळेत त्यांच्या स्केचबुकमध्ये स्केचेस करीत असताना दिसायचे. कार्यालयीन कामे ते जितकी सक्तपणे आणि काळजी घेऊन करीत असत, त्याहून अधिक स्वरूपाने त्यांचे स्केचिंग सुरू असायचे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी नव्याने सुरू होऊ पाहणाऱया कला संस्थांना मार्गदर्शन केले.

स्वतःसाठी मात्र त्यांनी नेहमी निसर्गाशी साथसंगत केली. राहत्या निवासाच्या गॅलरीतून दिसणारा निसर्ग त्यांच्या चित्रांचा ‘विषय’ बनला. राजाध्यक्ष सरांची ‘गॅलरी’ ही ‘चित्रनिर्मितीचं’ केंद्र बनली आहे. समोर दिसणाऱया एखाद्या लिंबाच्या झाडाचं खोड, त्यावर दिसणारं पोत/ टेक्स्चर आणि एकूणच त्याचं स्वरूप हे सरांना त्यांच्या रेखांकनाचा विषय भासते. पुढे वड, पिंपळ असे एकेक वृक्ष आणि त्यांची नैसर्गिक ठेवण हे त्यांचे ‘मॉडेल’ ठरतात.

निसर्गराजीतील वृक्षांना चित्रविषय ठरवत त्यांनी अप्रतिम स्केचिंग केले आहेत. या चित्रांचे प्रदर्शन 12 ते 18 सप्टेंबर या कालावधीत नेहरू सेंटरमधील कलादालनात पाहावयास मिळेल. वयाच्या 69 साठाव्या वर्षीही त्यांची अव्याहतपणे सुरू असलेली स्केचिंग साधना यानिमित्ताने अनुभवता येईल.

प्रत्येक वृक्षातील सौंदर्य शोधत राजध्यक्ष सरांनी स्केचिंग्ज आणि रेंडरिंग्ज बनवलेले आहेत. त्यांच्या स्केचिंगची ताकद एवढी आहे की, पानाफुलांनी बहरलेले हिरवे झाड आणि वाळलेले झाड हे आपसुक ओळखता येते. पानांच्या पुंजक्यातील पुढे-मागे आणण्याचा आभास, फळांची अचूक रेखांकने…सारं काही ‘ब्लॅक पेन इंक’ने, तरीही सुंदर वातावरण निर्मिती झालेली दिसते. हीच त्यांच्या प्रत्येक कलाकृतीची वैशिष्टय़े ठरावीत. त्यांच्या प्रत्येक स्केचिंग्जला एक कथा आहे, एकरूप होण्याची स्थिती त्यांना साधलेली आहे.