
एरियामध्ये फक्त आपलीच दहशत पाहिजे. सर्वांनी मलाच भाई बोलायचं… दुसरा कोणी आपल्या वरचढ होता कामा नये यासाठी सर्वांशी दादागिरी करणाऱ्या आणि याला ठोकतो, त्याला ठोकतो असे बोलणाऱ्या तरुणाचाच गेम झाल्याची घटना समोर आली आहे. त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला रेल्वे गुन्हे शाखेने पकडले आहे.
वाशी ते सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या पाम बीच ब्रीजखाली तीस वयोगटातील तरुणाचा 12 तारखेला मृतदेह सापडला होता. मृतकाचे तोंड बांधून, गळा आवळून व डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकांनीदेखील समांतर तपास सुरू केला. मयताचे नाव अनिल ठाकूरसिंग असल्याचे समजल्यानंतर पोलीस त्याची माहिती काढत असताना अनिलला गुंडगिरी करायचा नाद होता. त्याच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हादेखील दाखल असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी हार्बर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या दिवशी अनिलसोबत एक तरुण वाशी स्थानकापासून सानपाडा स्थानकापर्यंत पायी जाताना दिसून आला. त्या अज्ञात तरुणाचे नाव शुभम शुक्ला ऊर्फ पिकाचू असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ऐरोलीच्या दिघा गाव येथून उचलले. त्याला युनिट कार्यालयात आणून चौकशी केली असता, अनिलला भाई बनायचे होते. त्यामुळे तो मारण्याची भाषा करायचा. 12 तारखेच्या रात्री आम्ही नशेत होतो. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून त्याची हत्या केल्याचे शुभम याचे म्हणणे असल्याचे समजते.


























































