
>> वैश्विक
विराट विश्वात ‘नित्य नवे ते सतत घडे’ अशी प्रक्रिया सुरू असते. माणसाला त्याची जाणीव होण्यापूर्वीपासूनच या सर्व घडामोडी सुरू आहेत. घडणे आणि मोडणे हा वैश्विक उलाढालींचा अवकाशीय ‘स्वभाव’च असतो. आपल्याला निरीक्षणानंतर जे विस्मयकारी, अद्भुत वगैरे वाटतं ते विश्वाच्या रचनेचा केवळ एक भाग असतं. सर्वदूर पसरलेला हा नैसर्गिक पसारा म्हणजे कुणी व्यक्ती नव्हे. त्यामुळे तिथे घडणाऱया घटना निर्हेतुक असतात. त्या मुद्दाम घडवल्या जात नाहीत, तर आपल्याला नंतर समजलेल्या, पण पूर्वीच अस्तित्वात असलेल्या खगोलभौतिकी नियमांनुसार घडतात.
अर्थात नियमांच्या व्याख्या आपल्या सोयीसाठी आणि संशोधनासाठी. विश्वाला त्याची जाणीव असल्याचं कारण नाही, मात्र माणूस म्हणून या साऱयाचा विचार करताना, त्यातील वेगवेगळय़ा ‘गूढ’ गोष्टी जाणून घेता येणं, तशी जिज्ञासा असणं हे विचारशील, बुद्धिमान प्राण्याचं लक्षण आहे. त्यातही आधुनिक खगोल-अभ्यासाला तंत्रज्ञानाची वेगवान जोड मिळाल्याने काही गोष्टी आपल्याला समजल्या आहेत, तर आणखी असंख्य गोष्टीचं आकलन व्हायचं आहे.
अणुभंजन, गुरुत्वाकर्षण वगैरे सिद्धांत मांडले गेले नव्हते, त्या काळातही त्यानुसारच नैसर्गिक प्रक्रिया सुरू होत्या. सूर्याच्या किंवा एखाद्या ताऱयाच्या गाभ्यात हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर करणारी ‘अणुभट्टी’ अव्याहत सुरू असते हे समजलं एकोणीसाव्या शतकात, परंतु त्यापूर्वी कोटय़वधी वर्षे ती प्रक्रिया घडतच होती. फक्त आकलन झाल्यावर त्याचे ‘नियम’ आले की, प्रयोगप्रक्रिया सोपी होते. माणसाचं हे यश विश्वव्यापी आहे, त्याची जाणीव मात्र प्रत्येकाला असेलच असं नाही. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागणं गरजेचं ठरतं.
जीआरबी म्हणजे ‘गॅमा रे बर्स्ट’. काही दिवसांपूर्वी अशाच एका मोठय़ा उद्रेकाचं चित्र प्रसिद्ध झालं. आपल्याला सूर्यापासून जो प्रकाश मिळतो तो त्याच्या दृश्य प्रारणांचा म्हणजे ‘फोटॉन’चा असतो, परंतु अदृश्य प्रारणांमध्ये एक्स-रे, गॅमा रे, इफ्रारेड, रेडिओ अशी दडलेली प्रारणं असतातच. त्यांचा पुरावा सापडण्यापूर्वीही अशी काही किरणं असतील याची संशोधकांना कल्पना होतीच. प्रकाश प्रारणांमध्ये दृश्य प्रकाशाची प्रारणं सर्वाधिक. त्यानंतर एक्स-रे आणि नंतर ‘गॅमा रे’चा क्रमांक लागतो. ‘गॅमा रे’ विश्वाच्या सर्व भागांतून येत असतात. आपल्या सूर्याच्या ‘सौर ज्वालां’मधून (सोलार फ्लेअर) त्यांचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं.
युजिन फिनबर्ग आणि हेन्री प्रायमॅकॉफ यांनी ‘गॅमा रे’ची कल्पना 1908 मध्येच मांडली. त्यानंतर 1952 मध्ये हय़ुलिन्सन आणि 1958 मध्ये फिलीप मॉरिसन यांनी त्याचा अभ्यास केला. 1960 नंतर ‘गॅमा रे’च्या अस्तित्वाचा पुरावा केवळ योगायोगाने सापडला. अमेरिका-रशिया यांच्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या एका उपग्रहाला आपल्या अवकाशातून येणारे ‘गॅमा रे’ सापडले, असं खगोल मंडळाचे, डॉ. सागर गोडांबे यांनी सांगितलं. त्यांनी ‘गॅमा रे ऍस्ट्रॉनॉमी’ याच विषयात पीएच.डी. केली आहे. ते म्हणतात, ‘अमेरिकेत शिकत असताना वेरिटास ‘गॅमा रे’ टेलिस्कोपमधून आम्ही ‘क्रॅब पल्सार’मधून येणारा ‘गॅमा रे’चा संपूर्ण स्पेक्ट्रम (वर्णपट) शोधला होता. ‘गॅमा रे’ विश्वातील सर्व भागात निर्माण होतात. पृथ्वीवर ते वातावरणामुळे क्षीण होतात. ‘गॅमा रे’चं संशोधन करण्यासाठी अवकाशात टेलिस्कोप पाठवले असले तरी ‘गॅमा रे’ला जे मध्यम (मीडियम) लागतं ते अवकाशात नसतं. ‘गॅमा रे’चा ‘फ्लक्स’ कमी असतो म्हणून अवकाशाचा प्रचंड भाग आवाक्यात आणणारे टेलिस्कोप असावे लागतात. स्पेसमध्ये किती मोठी दुर्बीण पाठवणार? आपल्या पृथ्वीवरचं वातावरण ‘गॅमा रे’साठी अनुकूल ठरतं. आपल्याकडे हॅन्ले येथील (लडाख) ‘गॅमा रे’ टेलिस्कोपमधूनही आम्ही अभ्यास करतो.
रशियन वैज्ञानिक चेरेन्कॉव यांना ‘गॅमा रे’विषयक विशेष संशोधनाबद्दल 1938 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल प्राईज मिळालं. ‘गॅमा रे’ची एकूण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणं क्लिष्ट वाटू शकतं, त्यामुळे त्याच्या शोधाची ही सर्वसाधारण माहिती आहे. 1989 मध्ये व्हिवल टेलिस्कोपद्वारा ‘गॅमा रे’च्या एका उगमाचा पुरावा सापडल्यापासून याविषयी संशोधन सतत सुरू आहे.
2016 मध्ये ‘लायगो’ प्रकल्पाद्वारे 1916 मध्येच आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या ‘ग्रॅव्हिटेशनल वेव्हज’ किंवा गुरुत्वीय लहरींचा स्पष्ट पुरावा मिळाला. आमच्या मंडळातील एक संशोधक त्यावरही काम करत होत्या. ‘लायगो’ने 2017 मध्ये दोन न्यूट्रॉन ताऱयांच्या संमीलनातून निर्माण झालेलं ‘गॅमा रे’ उत्सर्जनही टिपलं.
आता 2022 मध्ये जीआरबी 21009 हा ‘गॅमा रे’ उद्रेक टिपला गेलाय. वातावरण ‘गॅमा रे’ आपलं शोषून घेतं किंवा निप्रभ करतं म्हणून ठीक, कारण तसे ते आपल्या आरोग्याला पोषक नाहीतच, मात्र ‘कोबाल्ट’पासून मिळणाऱया मर्यादित ‘गॅमा किरणांचा’ वापर किमोथेरेपीसाठी केला जातो.
23 एप्रिल 2007 रोजी आपल्या ‘इस्रो’ने अवकाशात सोडलेल्या रॉकेटवरून इटलीचा ‘अँजिले’ उपग्रह अवकाशात सोडला. त्यानेही अवकाशातील ‘गॅमा रे’चा शोध घेऊन ‘गॅमा रे’ उद्रेक नोंदवले. पृथ्वीवरचे ‘गॅमा किरण’ टेलिस्कोप प्रचंड आकाराच्या ऍन्टेना डिशसारखे असतात. त्याद्वारे सातत्याने संशोधन सुरू असून आपल्या देशाचाही त्यात वाटा आहेच.



























































