गणपती स्पेशल एसटीला मधल्या स्थानकांवर थांबा नाही, अतिवृष्टीचा स्पेशल वाहतुकीला फटका

723

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमा्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली खरी परंतू अतिवृष्टीने ‌या सर्व तयारीवर पाणी फेरले. मुंबई – गोवा महामार्गावर लोणेरे – माणगाव आदी ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती झाल्याने एसटीच्या गाड्या सुटल्याच नाहीत. उद्या पावसाचा अंदाज घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन विभागातून २३ बसेस बुधवारी सोडण्यात येणार होत्या. परंतु मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले. त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही मुंबई विभागातून दोन, ठाणे विभागातून दोन अशा चार बसेस आज मार्गस्थ करण्याचे नियोजन होते. परंतू, मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्याने निर्णय रद्द केला गेला, उद्या पावसाचा अंदाज घेऊन पुढची वाहतूक करण्यात येणार आहे. कालरात्रीपासून एसटीच्या गणपती आगाऊ आरक्षणाला सुरूवात झाली आहे. ग्रुप बुकिंगकरीता संबंधितांना जवळच्या आगारात संपर्क करण्यास सांगितले आहे. आगाऊ आरक्षण करताना प्रवाशांनी कोकणातील प्रमुख जिल्हा अथवा तालुक्याचे गाव निवडावे. (उदा. रत्नागिरी, मालवण, चिपळून, खेड, गुहागर, देवरुख, देवगड आदी.)

पॉईंट टू पॉईंट सेवा
या बसेस थेट पॉईंट टू पॉईंट चालविण्यात येणार आहेत. मधल्या कोणत्याही स्थानकांवर बस थांबणार नसल्याने मधल्या स्थानकांची नावे आरक्षणामध्ये नमूद केल्यास ती बस आरक्षणासाठी उपलब्ध होणार नाही. अर्थात, तालुका व जिल्ह्याच्या मुख्य स्थानकातून स्थानिक एसटी बसेसद्वारे प्रवाशांना आपल्या इच्छित गावचा प्रवास करता येईल असे महामंडळाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या