
लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र वाहतुकीचे नियम आमच्यासाठी नाहीच अशा आवेशात वावरणाऱ्या काही नागरिकांनी नियम पाळायचे नाहीत असे ठरवले आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लातूर वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी सुरू केली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा हार घालून त्यांचा सत्कार केला जात आहे.
सण उत्सवाचा व शेतीच्या मशागतीच्या कामाचा काळ असल्याने शहरातील रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. वाहनचालकांसोबतच जिल्ह्यातून येणारे नागरिक बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने गजबजलेल्या व गर्दीच्या मुख्य चौकात पेट्रोलिंग सुरु केले आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशांनुसार शहरातील मुख्य चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार बिर्ला पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, आवेज काझी व त्यांच्या पथकाने दिनांक 22 ते 25 जूनपर्यंत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या तसेच नो पार्कींग, मोठ्या आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर एकूण 262 केसेस करून 1 लाख 31 हजाराचा दंड वसूल केला आहे. तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याची विनंती करीत त्यांच्या गळ्यात फुंलांचा हार घालण्यात येत आहे.

























































