वधू न शोधू शकल्याने पैसे परत करा, ‘मॅरेज ब्यूरो’ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सध्याच्या काळामध्ये लग्न जुळणे आणि जुळवणे खूप कठीण झाले आहे. यासाठी लग्न जुळवून देणाऱ्या संस्था अर्थात ‘मॅरेज ब्यूरो’ही सुरू झाले. या मॅरेज ब्यूरोच्या माध्यमातून अनेक जण संसाराला लागले. परंतु गुजरातमधील कलोल येथे मात्र एक अजब प्रकरण समोर आले आहे. येथे एका मॅरेज ब्यूरोला दणका देत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकाचे पैसे परत करण्यास सांगितले आहे.

कलोल येथील शंकरलाल गुर्जर यांनी मुलगा विकास याच्यासाठी मॅरेज ब्यूरोमध्ये नोंदणी केली होती. जुलै 2020 मध्ये त्यांनी ‘सर्व ज्ञानती’ मॅरेज ब्यूरोमध्ये 1 लाख 11 हजार रुपयेही भरले होते. मात्र निर्धारित वर्षभराच्या काळात मॅरेज ब्यूरो विकाससाठी वधू शोधू शकले नाही. विशेष म्हणजे फी भरल्यानंतर मॅरेज ब्यूरोने त्यांच्याशी संपर्कही साधला नाही. तसेच त्यांनी याबाबत मॅरेज ब्यूरोमध्ये चौकशी केल्यावर चांगला बायोडाटा मिळाल्यास तुम्हाला सूचित करण्यात येईल असे सांगण्यात आले.

काही महिन्यानंतर मॅरेज ब्यूरोमधून शंकरलाल गुर्जर यांना फोन आला. गुर्जर पिता-पुत्राने मॅरेज ब्यूरो गाठल्यावर येथे त्यांना एका महिलेचा फोटो दाखवण्यात आला आणि विकाससाठी या स्थळाशी संपर्क साधण्याची परवानगी मागितली. गुर्जनर पिता-पुत्राने मुलीबाबत आणि कुटुंबियांबाबत अधिक माहिती देण्याची मागणी केली. ही माहिती दोन दिवसात देण्यात येईल असे मॅरेज ब्यूरोने सांगितले. दोन दिवसांनी गुर्जर कुटुंबियांनी मॅरेज ब्यूरोला फोन केल्यानंतर त्यांना महिलेचे कुटुंबीय शहराबाहेर गेल्याचे आणि तिच्याबाबत अधिक माहिती मिळण्यास 15 दिवसांचा अवधी लागेल असे सांगितले. काही दिवसांनी महिलेचे लग्न झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

एक महिन्यानंतर गुर्जर पिता-पुत्राला पुन्हा बोलवण्यात आले आमि एक फोटो दाखवण्यात आला. गुर्जर कुटुंबियांनी मुलीमध्ये रसही दाखवला परंतु मॅरेज ब्यूरोकडून प्रतिसाद मिळाला नाही. अधिक चौकशी केल्यावर मुलीला मुलगा नापसंत असल्याचे सांगण्यात आले. यातच एक वर्ष निघून गेल्याने गुर्जर पिता-पुत्राने मॅरेज ब्यूरोला कायदेशीर नोटीस पाठवली आणि गांधीनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली. त्यांनी मॅरेज ब्यूरोचे मालक मंथन गांधी यांनाही नोटीस पाठवली, मात्र उत्तर मिळाले नाही.

मॅरेज ब्यूरोकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकाचे सर्व पैसे परत करण्यास सांगितले. एवढेच नाही तर हे पैसे 9 टक्के व्याजाने परत करावे तसेच ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल अतिरिक्त 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.