वाचन वाढवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

इंग्रजी माध्यमात शिकणाऱया विद्यार्थ्यांना मराठी बोलताना, लिहिताना अडचणी येतात. याच्यावर एक उपाय म्हणजे शुद्ध लेखन. रोज दहा ओळी मराठीच्या पुस्तकात बघून शुद्धलेखन लिहायचे. त्यामुळे व्याकरणाच्या चुका पण टाळता येतात आणि अक्षरदेखील सुधारते. दहावीमध्ये शिकत असणारा सुमित त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये आला. कारण शाळेत त्यांना मराठीच्या शिक्षकांनी दहा निबंध लिहून आणायला सांगितले होते. मग ‘गुगल महाराज की जय हो’ असे म्हणत त्याने विविध विषय टाइप केले. वाचताना ही गोष्ट तुम्हाला साधी वाटेल, पण यात बरेच मुद्दे आहेत. निबंध लेखन आणि अवांतर विषयावरील लेखन यात सध्याचे विद्यार्थी कमी पडत आहेत.

सगळय़ा गोष्टी संगणक आणि इंटरनेट यातून मिळत असल्याने स्वतः वाचून, नोट्स काढून स्वतःचे लिहिणे हे कमी झालेले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बातमी लेखन, निबंध लेखन, वृत्तांत लेखन, जाहिरात लेखन, पत्र लेखन असा उपयोजित लेखनाचा भाग प्रश्नपत्रिकेत असतो. अनेक ठिकाणी तर निबंधाच्या पुस्तकातील निबंध पाठ करून लिहायला सांगितले जातात. परिणामी विद्यार्थ्यांची स्वतःची विचार करून लिहिण्याची प्रवृत्ती कमी होत जाते.

विद्यार्थ्यांनी वाचन वाढवण्याची खरोखर खूप गरज आहे. काही उपक्रमांतून भाषिक कौशल्याचा विकास करता येऊ शकतो. एक उदाहरण घेऊ या की, समजा एखाद्या व्यक्तीला राग आला आहे, ही भावना व्यक्त करणारे विविध वाक्प्रचार आठवायचे म्हटले तर क्रोधित होणे, अंगाचा तिळपापड होणे, तळपायाची आग मस्तकाला जाणे, खूप संताप येणे असे वेगवेगळे वाक्प्रचार सांगता येतील. रिकाम्या वेळात एखादा भाषिक खेळ घेऊन विद्यार्थ्यांची भाषा विकसित होऊ शकते.

सूत्रसंचालन आणि निवेदनाची संहिता लिहा असादेखील एक प्रश्न परीक्षेत असतो. त्यासाठी आपल्या वसाहतीत साजरे होणारे कार्यक्रम पाहता येतात. सुरुवातीला स्वागत, दीप प्रज्वलन, पाहुण्यांचा परिचय, भाषण, आभार प्रदर्शन असे अनेक टप्पे त्या संहितेत लिहायचे असतात. जेव्हा आपण हे कार्यक्रम पाहतो त्यातून या गोष्टी आपल्या लक्षात येतील. थोडक्यात वाचन वाढवणे हे आधी गरजेचे आहे.