विघ्नहर्त्या, दुष्काळाचे संकट दूर कर! संभाजीनगरात गणरायाचे उत्साहात स्वागत

30

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

विघ्नहर्त्या, दुष्काळाचे संकट दूर कर, अशी गणरायाला साद घालत जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशभक्तांनी गणरायाचे उत्साहात स्वागत केले. घरोघरीही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सिल्लोड तालुक्यावर असलेली दुष्काळाची गडद छाया विसरत ‘भरपूर पाऊस-पाणी पडू दे, संकट सारे टळू दे’ असे साकडे घालत, गुलालांची मुक्त उधळण करीत गणरायाच्या आगमनाचे सिल्लोड शहर व तालुक्यात भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या घोषासह ढोल-ताशांच्या गजरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शहरासह तालुक्यात या वर्षी १७५ सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली. १०० गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. तर सिल्लोड शहर येथे ३७ मंडळांनी परवानगी घेतली.

सकाळी घरगुती गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी शहरातील भगतसिंग चौकात झुंबड उडाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर घरोघरी होता. भक्तांच्या गर्दीमुळे जिल्हा परिषद शेजारचा रस्ता दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवला होता. दुपारपर्यंत हा भाग गर्दीने फुलला होता. पूजेसाठी लागणारी दुर्वा आणि मिठाई घेण्यासाठीही मोठी गर्दी होती. वेगवेगळ्या आकारातील आकर्षक मूर्ती घरी नेण्यासाठी बच्चे कंपनीसह महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या वर्षी मूर्तीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. पन्नास रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयापर्यंतच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

गणपतीसमोर आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध होते. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकत्र्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात कार्यकर्ते आपापल्या गावाकडे गणरायांना वाहनांतून घेऊन जात होते. तालुक्यावर सध्या पिण्याच्या पाण्याचे जलसंकट उभे आहे. शेतातील पीक साठ टक्के वाया गेल्याचे चित्र आहे. असे असतानाही उत्साहात गणरायाचे स्वागत केले. ‘भरपूर पाऊस-पाणी पडू दे, संकट सारे टळू दे’ असे साकडे भक्तांनी गणरायांना घातले.

घाटनांद्रा – परिसरात गणरायाच्या आगमनानिमित्त चैतन्याचे वातावरण होते. गुलालाची उधळण करीत व ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत गणरायाचे स्वागत केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे दर वाढलेले असल्यामुळे अनेकांनी पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती खरेदी करण्यावर भर दिला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत गणेशाची स्थापना करण्याचे मुहूर्त असल्याने गणेश मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. वाजतगाजत गुलालाची उधळण करत गणेशाची स्थापना केली.

वैजापूर – विघ्नहर्ता श्रीगणेशाचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रीगणेशाच्या आगमनाने गणेश मंडळांमध्ये चैतन्य व उत्साहाचे वातावरण आहे. ढोल-ताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत सजवलेल्या वाहनांमधून मिरवणूक काढत त्यांनी लाडक्या गणरायाचे स्वागत केले. यंदा शहरातील ४५ गणेश मंडळांसह एकूण ७९ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याची माहिती पोलीस नाईक संजय घुगे यांनी दिली. मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुभाष जोशी, प्रकाश पाटील, बाळासाहेब चव्हाण, जयपाल राजपूत, अशोक चांदकर, वाल्मीक शेटे, गणेश जोरे, अरुण कुलकर्णी, गणेश टिभे, भागीनाथ त्रिभुवन, विष्णू आलुले, बाबुलाल महाजन, राजेंद्र राजपूत, संतोष रत्नपारखी आदींची उपस्थिती होती. तालुक्यात १८ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.

सावळदबारा – येथे व परिसरात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांची लगबग सुरू होती. कुटुंबापासून ते लहान-मोठ्या मंडळांनी आपापल्या परीने ‘श्री’ची मूर्ती वाजतगाजत, गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पायी, दुचाकी, हातगाडी व चारचाकी वाहनांतून घरी आणली जात होती.

रत्नपूर – विघ्नहत्र्या गणरायाचे आज शहर व तालुक्यात मंगलमय वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली.

शहरातील सात मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. तालुक्यात एकूण ७५ मंडळाने गणरायाची प्रतिष्ठापना केली असून, एक गाव एक गणपती ३५ ठिकाणी बसल्याची माहिती पोलिसांनी दिली. गणरायाच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर आराशीचे साहित्य, फळे, फुले, फटाके, किराणा वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. गणेशोत्सव काळात ४ अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी, ५ महिला कर्मचारी, ५० होमगार्ड, १० महिला होमगार्ड असा बंदोबस्त तैनात केला असल्याचे पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या