
रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना मेल करून त्यांच्याकडून 400 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. खंडणीची मागणी करणारे मेल्स सातत्याने पाठवण्यात येत होते. धमकी देणाऱ्याने या मेल्सकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला होता.
31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान हे मेल्स पाठवण्यात आले होते. धमकी देणाऱ्याने स्वतःचं नाव शादाब खान असं सांगितलं होतं. अखेर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेश वानपारधी असं त्याचं नाव आहे.
मुकेश अंबानी यांना धमकी देण्याचे प्रकार 27 ऑक्टोबरपासून सातत्याने सुरू होते. पहिल्या मेलमध्ये 20 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर काळात त्यांना 400 कोटींच्या खंडणीसाठी मेल करण्यात आले. सलग चार वेळा धमकी आल्याने अंबानी यांच्या सुरक्षा यंत्रणेने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तिविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्यानंतर धमकी देणाऱ्याचे लोकेशन तेलंगणा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तेलंगणातून गणेश वानपारधी या तरुणाला अटक केली आहे.

























































