
कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर विसर्जनासाठी आलेल्या सार्वजनिक व घरगुती गणपतींची आरती सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाली. कराड शहरातील एकूण साडेसात हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. घरगुती आणि सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांचे विभागातील नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विसर्जन केले आहे.
कराडला गेल्यावर्षी प्रमाणे नगरपालिकेने प्रीतिसंगमावर एक चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण केली आहे. एकूण अठरा ट्रॅक्टर कराड परिसरामध्ये आणि त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गणेशमूर्ती संकलन करून प्रीतिसंगमावर आणल्या व विधिवत आरती करून नगरपालिका आणि सामाजिक संस्था यांच्या बोटींद्वारे खोल पाण्यामध्ये मूर्तींचे विसर्जन केले. दहा दिवसांमध्ये लोकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विसर्जसनासाठी नदीपात्रात असणाऱ्या बोटींची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या. बाळासाहेब पाटील म्हणाले, दहा दिवस मोठ्या उत्साहाने सार्वजनिक मंडळे व घरगुती श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी कोरोनाच्या तीव्र सावट गणेशोत्सवावर होते. यावर्षी थोडी शिथिलता आली त्यामुळे सर्व ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व नियमांचे पालन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी शांततेत गणेश विसर्जन झाले आहे. कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, नगरसेवक हणमंत पवार, नगरसेविका अंजली कुंभार, जयंत बेडेकर, अख्तर आंबेकरी, सामाजिक कार्यकर्ते, दादासाहेब शिंगण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी व भाविक उपस्थित होते.
























































